Wednesday, November 21, 2012

किल्ले : कलावंतीण दुर्ग

किल्ले : कलावंतीण दुर्ग 
लेखक: विकासराव उर्फ काथ्या



कलावंतीण व प्रबळगड
  रसाळ गडाच्या अविस्मरणीय मोहिमे नंतर भरारी  ग्रुपचे  समस्त मावळे आतुर तेने वाट पाहत होते ते म्हणंजे पुढील मोहिमेच्या आयोजनाची .परंतु भरारी चे कर्णधार श्री आमोद राजे यांना दुसर्या पुत्र रत्नाची प्राप्ती झाल्यामुळे ते जरा गडबडीत होते . सर्व काही आलबेल झाल्यानंतर राजे यांचा "चला ट्रेक ला " असा e -खलिता सगळ्यांच्या mailbox मध्ये येऊन थडकला आणि मंडळी पुन्हा एकदा उत्साहाने फुरफुरली . राजेनी यावेळेस खोपोली पनवेल पट्यातले "कलावंतीण - प्रबळगड" असे नितांत सुंदर किल्ले मोहिमे साठी निवडले आणि निम्मी बाजी तिथेच जिंकली . कलावंतीण प्रसिद्ध आहे त्यावरील अप्रतिम खोदीव पावट्यान्चया माळेमुळे आणि त्यावरून दिसणाऱ्या विहंगम दृष्यामुळे , तर प्रबळगड ओळखला जातो त्याच्या अवाढव्य विस्तार आणि घनदाट जंगलामुळे.

 


   शुक्रवारी रात्री उशिरा निघून प्रबळ माचीवर मुक्काम आणि नंतर सकाळी लवकर कलावंतीण वर चढाई करून (बाकी किल्ल्याला नाव देणारा थोडा रंगीत रसिकच असला पाहिजे, असो..) प्रबळगड सर करून संध्याकाळ पर्यंत पुण्यात परत असा बेत ठरला . राजे यांच्या घरातून निघून सगळ्यांना वाटेत pick up करत शेवटी अस्मादिकांना बाणेर येथून घेऊन जुन्या मुंबई पुणे महामार्गाने खोपोलीकडे कूच करायचे ठरले . एकच रुखरुख म्हणजे आमचे परमप्रिय अध्यक्ष मा. निलेश वाळिंबे आणि रसालगड मोहिमेचे हिरो श्री BK उर्फ भास्कराचार्य  हे या मोहिमेमध्ये सामील होणार नव्हते .
   तर ठरल्याप्रमाणे रात्री .३० येणारी गाडी (फक्त) एकच तास उशिरा आली आणि आम्ही पण आमचे शुक्रवार रात्रीचे भोजन आटपून श्री राजे श्री सतीश सूर्यवंशी यांच्यावारोबर मारुती अलटो मध्ये स्थानापन्न झालो . यावेळेस आमच्या ताफ्यामध्ये मारुती अलटो मारुती बलेनो असे - मारुती होते.
नोव्हेंबर च्या बोचर्या थंडीमध्ये आमचा प्रवास सुरु झाला परंतु सत्याच्या अप्रतिम कोट्या आणि हास्य विनोदांमुळे खोपोली कधी आली ते कळला पण नाही .शेडुंग फाटा सोडून रस्ता चुकून आम्ही पुढे गेलो. टोल नाक्या वरच्या लोकांच्या सहकार्य मुळे आम्हाला उलट बाजूने गाडी घुसून दिली आणि आम्ही बरोबर रस्त्या ला लागलो .  मात्र पुढे रस्त्यांच्या भुल्-भुलैया मध्ये फसून एका भलत्याच गावात जाऊन पोहोचलो आणि पुढे बघतो तर dead end !! . मग काय गाड्या वळवून परत एकदा उलट्या दिशेला लागलो , मात्र तेवढ्यात सुधा सत्याने त्याची अलटो भर्रकन वळवून दाखवून स्वतच्या गाडीचे आणि स्वताचे कौतुक करून घेतले . शेवटी एकदाचे आम्ही ठाकूरवाडी या पायथ्याच्या गावात येऊन पोहोचलो आणि गावातल्या मारुती मंदिरासमोर गाड्या लावून किल्ल्याकडे मार्ग क्रमन चालू केले. परंतु चांगला गाडी रस्ता आहे हे बघून आम्ही गाड्या जेवढ्या जातील तेवढ्या वर नेण्याचा ठरवला आणि दोन्ही चालक परत मागे येऊन गाड्या घेऊन आले . बलेनो एका अवघड आणि अरुण्द फाट्या जवळ लावायचे ठरले . मात्र निधड्या छातीच्या सत्याने त्याची आल्तो अजून वर नेऊन जिथे गाडी जाऊच शकत नाही अशा ठिकाना पर्यंत नेली . (आता इथे निधडी छाती कि चालण्याचा कंटाळा हे ज्याचे त्याने ठरवावे .).
ट्रेक सुरु करणार तेवढ्यात राजेंच्या घारीच्या नजरेने बाजूच्या खडकावर काहीतरी हालचाल टिपली आणि बघतो तर काय एक अतिशय सुंदर हिरवाकंच बांबू पिट व्हायपर आमच्या स्वागतासाठीच जणू काय तिथे वाट पाहत बसला होता . मग काय , राजे नि त्यांचा नवीन Canon D काढला आणि क्लिक क्लीकाट सुरु केला . - फोटो काढून झाल्यानंतर ते सर्पराज जरा वैतागले आणि आता पुरे गड्यानो , जातो शिकारीला असे म्हणत बाजूच्या झाडीत दिसेनासे झाले
बांबू पीट  वायपर
 आणि आमच्या तंगड तोडीस सुरुवात झाली . एखाद्या घाटा सारख्या वळनां वळणा च्या त्या रस्त्यावर चालाने फारच सुखद होते .वर चांदण्याने गच्च भरलेले आकाश , कोरीव चंद्रकोर , मधेच वाऱ्याची एखादी येणारी झुळूक आणि रात्रीची निरव शांतता फारच आल्हाद दायक होती.तिथे आवाज होता तो फक्त सहा सह्याविरांच्या पाय रवीचा .
साधारण पणे तासाभरात आम्ही प्रबळ माची च्या मुख्य दरवाजात पोहोचलो आणि राजेंची नजर गेली एका अर्धवाट बांधलेल्या ओट्यावर . गुढघाभर उंचीची भिंत , आजू बाजूला मोकळी जागा आणि वर सताड खुला आकाश , अशी ती जागा राजेंनी रात्रीच्या मुक्कामासाठी नक्की केली . मग काय , मंडळीनी आप आपल्या वळकट्या उघडल्या आणि थोड्या गप्पा मारून सगळे एकमेकांशी स्पर्धा केल्या सारखे घोरायला लागले . जाणत्या आणि वाचत्या मंडळीनी इथे पु देशपांडे यांनी केलेलं म्हैस या कथेतला ST बस मधल्या प्रवाशांच्या झोपेचा वर्णन आठवावा
काथ्या, मंदार, राकेश,सुशांत आणि सत्या
तोपर्यंत पहाटेचे वाजले होते .साधारण दोन तासांच्या डुलकी नंतर सकाळी झुंजूमुंजू होईपर्यंत काही मंडळी उठली . वरून दिसणारा देखावा केवळ अवर्णनीय होता . दक्षिणेकडे दूरवर धुक्यामध्ये कर्णाळा अंगठा वर करून जणू काय आम्हाला प्रोत्साहित करत होता तर पश्चिमेकडे हाजी मलंग चंदेरी चे उत्तुंग सुळके आव्हान देत उभे होते.आजूबाजूची खेडीपाडी सकाळच्या कोवळ्या सूर्य प्रकाशामध्ये न्हाहून निघाली होती तर छोटे मोठे डोंगर धुक्याची दुलई घेऊन निजाल्यासारखे भासत होते. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता आणि ठाकरवाडी मधील ग्रामादिवासी भाऊ पण आपापल्या कामाला निघाले होते .


पटापट सामान आवरून आम्ही ठाकूरवाडी कडे कूच केले . तिथे एका नैसर्गिक पाणवठा पाहून काहीजनाणी आपापली शिकार उरकून घेतली .(समजले नसल्यास अध्यक्ष साहेबाना विचारावे) वर सपाटीला गेल्यानंतर आम्ही चहा करण्यासाठी जागा शोधू लागलो . परंतु चुलीसाठी दगड मिळाल्यामुळे शेवटी एका खडकाच्या नैसर्गिक कपारीमध्येच चूल मांडायचे ठरले . मात्र त्या चुलीची उंची पाहून त्याला बिरबलाची खिचडी ची चूल अशी उपमा मिळाली . साहजिकच १० मिन्टा मध्ये होणाऱ्या चहासाठी तब्बल अर्धा तास लागला .शेवटी एकदाचा चहा झाला मंडळी जवळच्या एका घरामध्ये चौकशी साठी गेली .त्यातही सत्याने चार तासाचा चहा अशी खवचट प्रतिक्रिया दिलीच . त्या घरात सामान टाकून आणि घराच्या माऊलीला दुपारच्या भोजनाचे सांगून आम्ही चढाई च्या दुसर्या टप्प्यास प्रारंभ केला
जाऊ का नको जाऊ?

तासाभरात घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही प्रबळ कालावान्तीन यांच्यामधील घळीमध्ये जाऊन पोहोचलो . उजवीकडे प्रबळ चा अवाढव्य डोंगर तर डावीकडे कलावंतीण चा अंगावर येणारा सुळका असे ते दृश्य होते. कालावान्तीन चा खडा सुळका पाहून मी आणि सत्याने नांगी टाकली बाकीच्या मंडळीना जाऊन येण्यास सांगितले .

पण राजे आमचा ऐकायच्या स्थितीत नवते . - शेलक्या शिव्या घालून आणि अर्ज विनंत्या करून कसेबसे मी आणि सत्या वर चढायला तयार झालो . खोदीव पायऱ्या वरून एक दोन करत केवळ १५ मिनटा मधेच आम्ही मधल्या माथ्यावर पोहोचलो . खालून पाहताना हि पायऱ्या ची वाट फारच भीतीदायक वाटते, मात्र या पायऱ्या इतक्या कौशल्याने खोदल्या आहेत कि चढणाऱ्या आणि उतरनार्याला अजिबात दृष्टीभय (exposure ) वाटत नाही . त्याबाबतीत त्या अज्ञात शिल्पकाराला शतश: प्रणाम !!



माथ्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय अजून एक सरळसोट खडक आमच्या कलावंतीण च्या सर्वोच्च टोकावर जाण्याच्या मध्ये होता. इथे मात्र माझी सत्याची चांगलीच तंतरली . हो-ना करता करता शेवटी मी सत्या तयार झालो आणि मा. अध्यक्ष साहेबांच्या ओळी आठवल्या "पहाडा समीप छाती ज्यांची , नजर ज्यांची करारी , तेच ह्या सह्याद्रीत घेतील भरारी". थोडेसे अवसान अंगात आले.
सत्याची भरारी

 कर्णधार राजे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही तो खडकाचा टप्पा पार केला सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो , आणि आम्हास स्वर्ग दोन बोटे उरला . फारच विहंगम दृश्य होते ते.

एका बाजूला मलंग गड ,चंदेरी , पेब , माथेरान अशी भलीमोठी डोंगररांग तर दुसरीकडे लांबवर आकाशात घुसलेला कर्णाला . शेजारीच प्रबळगड नावाप्रमाणेच प्रबळ भासत होता .

 घनदाट जंगल परिसराची शोभा अजूनच वाढवत होता .आजूबाजूची छोटीमोठी खेडी , त्यांची कौलारू घरे , मधूनच दिसणारा एखाद्या धनिकाचा टुमदार बंगला , काही पाणथळ जागा बंधारे ,वळणं वळणाचा रस्ता असा तो देखावा होता .भरपूर फोटो सेशन झाल्यानंतर परत एकदा राजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे त्या खडकाच्या खाली उतरलो . पायर्यांच्या वाटेला लागणार तोच आमच्या बरोबर पहिल्यांदाच आलेल्या श्री मंदार मुकादम यांच्या चाणाक्ष नजरेला बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवली . पाहतो तर काय, एक - फुट लांबीची भली थोरली घोरपड !!! 

 रात्री स्वागताला बांबू पी व्हायपर आणि आता निरोपाला घोरपड, निसर्गदेवता आमच्यावर प्रसन्न होती. सगळ्यांचे कॅमेरे बाहेर निघाले आणि त्या घोरपडीचे एखाद्या सेलिब्रिटी सारखे स्वागत झाले . भरपूर फोटोसेशन करून आम्ही परतीचा रस्ता धरला.

साधारणत: तासाभारात आम्ही खाली वाडीवर पोहोचलो . जेवण तयार होतेच . तांदळाची भाकरी , वांगे बटाटे आणि मटकीची भाजी , फोडणीचा वरण , लोनचा , पापड आणि भात असा बेत होता . चुलीवरच्या त्या जेवणाची चव एखाद्या पंचतारांकित बुफे ला लाजवेल अशी होती . अशा साध्या पण उत्कृष्ट जेवणावर उभा आडवा हात मारून मंडळी नि वामकुक्षी ची तयारी सुरु केली आणि आपापल्या वळकट्या उघडल्या . पुन्हा एकदा घोरण सत्र सुरु झाले . चढाई च्या थकव्यामुळे आणि चविष्ट भोजनाने पोटोबा तृप्त झाल्यामुळे मावळे वेगळ्याच जोशात घोरू लागले .
उन्ह उतरनीला लागल्यावर शेवटी मंडळीना आज घरीपण जायचे आहे अशी आठवण झाली आणि सामानाची बांधाबांध सुरु झाली .एक दीड तासात आम्ही खाली गाडीजवळ पोहोचलो आणि पुढील प्रवास चालू केला . खोपोलीमध्ये चहापान करून सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्चा दिल्या आणि पुण्य नगरीकडे प्रस्थान केले . दिवाळीच्या पूर्व संध्येला केलेल्या एका सुंदर ट्रेक ची सांगता झाली.
मोहिमेतील सहभागी मावळे - आमोद राजे, सतीश सूर्यवंशी , विकास पोखरकर , श्री पाटील , मंदार मुकादम , राकेश जाधव .