Wednesday, January 8, 2014

शिंदी च्या शिडी वरून महिपतगडाची स्वारी



 भरारी महिमंडनगडचकदेव - महिपतगड

-विकास पोखरकर (काथ्या)


२९ डिसेंबर २०१३: पुणे – तापोळा – (लौंच) – आरव – शिंदी – महिमंडनगड – चकदेव
३० डिसेंबर२०१३: चकदेव – शिडीची वाट – आंबिवली – वडगाव (खु)
३१ डिसेंबर २०१३: वडगाव (खु) – महिपतगड
१ जानेवारी २०१४: महिपतगड – दहिवली – भरणे नाका - पुणे




सह्याद्री
 ३१ डिसेंबर २०१३ ची टळटळीत दुपार . सूर्य नारायण माथ्यावर पूर्ण तेजाने तळपत आहे . ५-६ तासाची सलग चढाई करून , जंगल दर्या पार करत ६ भरारी वीर महिपत गडाच्या पूर्व माथ्यावर पोहोचले आहेत .मळलेले कपडे , रापलेले चेहेरे,  घामेजलेली शरीरे परंतु डोळ्यात मात्र गेल्या ३ दिवस केलेल्या सह्ययात्रेचे अवीट समाधान!!  समोर दिसत आहे सह्याद्रीचे विशाल रूप , असंख्य शिखरे , डोंगर आणि कोंकणात उतरणाऱ्या कितीतरी घाटवाटा. उतरेकडील प्रतापगडापासून ते दक्षिणेच्या चकदेव पर्यंत , निळ्या कॅनवास वर एखादा हिरवा निसर्ग चित्र जणू. ती पहा मधु मकरंद गडाच्या बगलेतून नागमोडी वळणे घेत थेट खाली कोंकणात उतरणारी कराल कोंडनाळ, इतक्या दुरून सुद्धा तिचा थांग लागत नाही . याच घळीमध्ये गतवर्षी आम्ही अडकलो, नव्हे कोंडलो होतो. त्या मानाने तिच्या जवळचा हातलोट घाट एखाद्या प्रशस्त राजमार्गासारखा भासत होता. ३ दिवसाचा जम्बो ट्रेक करून आज वर्षअखेरीची रात्र महीपत गडावर काढून नववर्षीचा सुर्य दर्शन देखील गडावरील पारेश्वराच्या साक्षीने घेण्याचा भरारीचा बेत प्रत्यक्षात उतरला होता तो केवळ आम्हा पोरांच्या जिद्दीने .


सालाबाद प्रमाणे यावेळेस सुद्धा नववर्षाचे स्वागत एखादी तगडी मोहीम आखून करायचा ठरला होता . त्याप्रमाणे मेलामेली करून दिवस ठरले होते २८ डिसेंबर २०१३ ते १ जानेवारी २०१४. चकदेव , महिमंडन गड , पर्बत , नाळेच्या वाटेने खाली कोकणात उतरून महिपतगडावर प्रयाण असा एकंदरीत बेत ठरला . २८ च्या रात्री ११.३० वाजता कर्णधार राजे यांच्या कात्रज येथील निवास स्थानी जमण्याचे ठरले . भरारी चे खंदे कार्यकर्ते निखील केळकर यांनी केलेल्या अप्रतिम कोंबडी रस्श्यावर ताव मारून मी, डेंगळे आणि सत्या बरोबर वेळेत राजे यांच्या कडे दाखल झालो . हिमालय पुत्र सुदीप माने वगळता एक एक करून सर्व मावळे राजे यांच्या कडे दाखल झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सत्या आमच्या बरोबर येऊ शकणार नव्हता तर अध्यक्ष वाळिंबे यांच्या कार्यालयीन कामामुळे ते थेट महीपत गडावर येउन दाखल होणार होते.

शेवटी एकदाचे रात्री १२.३० वाजता सुदीप चे आगमन झाले व आमचे चक्रधर अण्णा यांनी सुकाणू हाती घेत starter मारला आणि गणपती बाप्पा मोरया करत आमच्या प्रवासास सुरुवात झाली. 


सुखद गारव्या मध्ये गप्पा मारत , तर कधी  डुलक्या घेत पहाटे 3 च्या सुमारास आम्ही तापोळे येथे कोयना धरणाच्या धक्क्याजवळ पोहोचलो. इथून पुढे आम्हाला लौंच ने शिंदी पर्यंत जायचा होता. आधीच ठरवल्याप्रमाणे आमचे नाविक श्री सावंत वेळेवर हजर झाले आणि आमचं सामान(ते नाही) भरभर होडी मध्ये चढवून रात्रीच्या काळोखामध्ये त्या अथांग शिव सागरामधून आमचा प्रवास सुरु झाला.

जल रथ

बोचरी थंडी , आजूबाजूला सह्याद्रीचे छोटे मोठे डोंगर आणि त्याला भेदत जाणारा शिव सागराचा विशाल जलाशय , वर कोरीव चंद्रकोर , चमचमणाऱ्या तारकांनी गच्च भरलेला आकाश, इंजिनाचा एकसमान लयीतला आवाज आणि संथपणे मार्गक्रमण करत जाणारी आमची एकटी नौका..खरोखर अत्यंत अविस्मरणीय अनुभव होता तो. 

आरव गावातली पहाट


भल्या पहाटे शिंदी च्या अलीकडील आरव या नावाप्रमाणेच नितांत रमणीय खेड्यात आम्ही पोहोचलो. आजूबाजूचा परिसर धुक्यामध्ये हरवला होता आणि पाण्यामधून चक्क वाफा बाहेर पडत होत्या. त्या उबदार पाण्यात डुबकी मारायची अनावर इच्छा झाली परंतु वेळेअभावी ते शक्य नव्हते. पाणी उथळ असल्यामुळे शिंदी पर्यंत होडी जाऊ शकणार नव्हती त्यामुळे इथेच उतरून आम्ही आमच्या नाविक मामांची बिदागी देऊन निरोप घेतला आणि आरव - शिंदी गाडीमार्गापर्यंत आलो . २००९ पासून कोंकणातल्या खेड पासून रघुवीर घाटमार्गे अकाल्पे गावापर्यंत रस्ता खुला झाला आहे. आरव , वळवण, शिंदी ही सर्व गावे याच रस्त्यावर येतात. थोड्याच वेळात खेड ST आली व अर्ध्या तासात आम्ही शिंदी ला उतरलो . शिंदी मध्ये गरमा गरम पोह्यांचा फडशा पाडून आणि चहा बिस्किटे फस्त करून मंडळींचा पोटोबा शांत झाला.
शिंदी गाव

 आणि तृप्त मनाने वाटाड्या घेऊन आम्ही कूच केले किल्ले महिमंडन गडाकडे. महिमंडन गड हा एक छोटेखानी किल्ला आहे . शिंदी गावातून केवळ ४५ मिनटामध्ये आम्ही गडावर पोहोचलो . 

महिमंडणगड

गडा वरील खोदीव टाके

महिमंडणगड वरील मंदिर





 वर एक भग्न मंदिर आणि पाण्याच्या टाक्याशिवाय काही अवशेष शिल्लक नाहीत. वरून चकदेव , पर्बत, रघुवीर घाट आणि आजूबाजूच्या परिसराचे उत्तम दर्शन होते.

 अर्ध्या तासात खाली उतरून आम्ही आमचे सामान खांद्यावर टाकले आणि चकदेव कडे प्रस्थान केले. २ तासात आम्ही चकदेव च्या चौकेश्वर मंदिरात पोहोचलो . जुन्या बांधणीचे हे शिवालय अतिशय सुरेख असून अत्यंत पुरातन आहे . प्रांगणात भला मोठा दगडी नंदी असून आतील कलाकुसर केलेल्या  मूर्ती अतिशय सुबक आहेत . गावकर्यांनी आता पक्का बांधकाम करून मंदिराचा विस्तार केला आहे . तेथील आवारात २०-३० लोक आरामात राहू शकतात . मंदिराच्या बाहेर ५ मिनटाच्या अंतरावर पाण्याची टाकी व नळ आहेत . 

श्री चौकेश्वर मंदिर - चकदेव

मंदिराच्या बाहेर आम्ही चूल पेटविली आणि गरमागरम Maggi आणि चहा चा आस्वाद घेत आजूबाजूच्या सुंदर वातावरणाचा आनंद लुटू लागलो. तिथून समोर आडवा पसरलेला पर्बत डोंगर अतिशय सुरेख दिसतो . थोडेसे निरखून बघितल्यावर त्यावरील मल्लिकार्जुन मंदिराचा पांढरा ठिपका हि उठून दिसतो . 

थोड्याच वेळात काही गावकरी विचारपूस करण्यासाठी आले आणि त्यांनी मुक्काम देवळात न करता गावातील पडक्या शाळेत करण्याची आदेशवजा विनंती केली . शाकाहाराबाबत अत्यंत आग्रही असलेल्या गावकर्यांना बहुदा आमच्या कडे काहीतरी वशाट असल्याचा सुगावा लागला होता , कारण आमच्या वाटाड्याला डेंगळे कडे असलेल्या उकडलेल्या अंड्या विषयी कळले होते आणि गप्पांच्या नादात त्याने बहुतेक गावकर्यांना सांगितले होते. गावकर्यांच्या इच्छेला मान देऊन आम्ही आमचे सामान जवळच असलेल्या पडक्या शाळेत हलवला आणि संध्याकाळच्या भोजनाची तयारी सुरु केली.

मुक्काम पोस्ट चकदेव


 सुदीप लाकडे आणण्यासाठी गेला तर पाटील बंधू आणि डेंगळे पाणी आणण्यासाठी रवाना झाले . थोड्याच वेळात चूल पेटली व मंडळीनी नि कांदे व बटाट्याची कापाकापी सुरु केली . अंडा रस्सा आणि भात असा मेनू ठरला . अध्यक्ष वाळिंबे यांच्या अनुपस्थितीत बल्लवाचार्यांचा मानाचा पोशाख राजे यांना चढविण्यात आला आणि राजेंनी पण थोड्याच वेळात एकदम भन्नाट अंडा करी आणि मसालेभात असा मेनू आमच्या समोर सादर केला . मग काय , सकाळपासून भुकेले असलेल्या मावळ्यांनी त्या सुग्रास भोजनावर उभा आडवा हात मारला आणि तृप्तीचे ढेकर देऊन मंडळी बाहेर चांदण्याखाली येउन बसली .शिळोप्याच्या गप्पा मारत आणि उद्याच्या चढाई ची आखणी करत एक एक करत सगळे निद्रिस्त झाले .
सकाळी उठून पाहतो तर काय , सगळीकडे धुक्याचे साम्राज्य होता . चकदेव गाव पूर्णपणे धुक्याची दुलई घेऊन निजला होता. प्रातर्विधी आटपून आम्ही परत चूल पेटविली आणि गरमागरम चहाचे घोट घेत चकदेव च्या रम्य आणि शांत सकाळचा आनंद घेऊ लागलो . वाटाड्या शोधण्यासाठी मी व तानसेन राकेश गावात गेलो खरे परंतु नेमका त्याच दिवशी गावात प्रतिष्ठापना कार्यक्रम असल्यामुळे दुर्दैवाने आम्हास पर्बत पर्यंत सोडण्यास कुणी वाटाड्या मिळेना . शेवटी गावातीलच एक मामा आम्हास चकदेव ची शिडी ची वाट दाखविण्यास तयार झाले . अखेरीस आम्हास पर्वतचा बेत रद्द करून चकदेव च्या शिडी ची वाट पकडावी लागली . 
शिडी ची वाट

थोडा पुढे गेल्या नंतर मामा म्हणाले - पोराहो जंगलामधून जायचा का ? गवे दिसतील . ते ऐकून आमच्याही तोंडास पाणी सुटले . म्हणालो चला !! मग काय रुळलेली वाट सोडून आम्ही सरळ जंगलात घुसलो. सुमारे तासभर जंगल भ्रमंती केल्यानंतर सुद्धा दुर्देवाने (आमच्या सुदैवाने) आम्हास गवे किंवा कुठल्या रानटी श्वापदाचे दर्शन झाले नाही मात्र रंगी बेरंगी फुलपाखरे , विविध जातीचे पक्षी आणि जंगलातील निरव शांतता अनुभवता आली. 

गवा इथे होतं ह्याचा पुरावा
 
शिडीची वाट टप्प्यात आल्यानंतर जवळच्या पाणवठ्या वरून आम्ही आमच्या बाटल्या भरून घेतल्या आणि खाली दिसणाऱ्या कोकणच्या विहंगम दृश्याचा आनंद घेत तिथेच घाटमाथ्यावर जर विसावलो. 
शिडी च्या पठारा वर असलेला पाणी


शिडीच्या वाटेच्या सुरुवातीलाच श्री गजाननाची एक शेंदरी मूर्ती आहे . तिला नमस्कार करून आम्ही शिडीच्या टोकाशी आलो . कड्याच्या खोबणीमध्ये बसविलेल्या एकूण ३ लोखंडी शिड्या आहेत . आधी तिथे लाकडाच्या शिड्या होत्या , परंतु काही दिवसापूर्वीच गावकर्यांनी तिथे या लोखंडी शिड्या बसवून पर्वतयात्रींचे काम खूपच सोपे केले आहे.इतक्या अवघड जागी एवढा लोखंडी सामान आणून आणि ते सांधून तिथे बसवणं खरोखरीच जिकिरीचा काम असणार . त्या अज्ञात कार्य कर्त्यांना आमचा शतश: प्रणाम !  एकेक पावूल तोलून मापून टाकत आणि पाठी वरील अवजड ओझे सांभाळत हळू हळू सर्व जन तिन्ही शिड्या उतरले .



शेवटची शिडी

शिडी चा कातळ कडा

इथून पुढे सलग ३ तासाची उतरण आहे (अंदाजे १००० मीटर) , जी सरळ तुम्हाला कोकणात आंबिवली गावी घेऊन जाते . वाटेत एका नाकावर धनगरांची २-३ झापे आहेत. तिथे आम्ही आमचा पहिला विश्राम घेतला आणि थोडा कोरडा खाऊ आणि पाणी पिउन ताजेतवाने होत पुढील प्रवासास सुरुवात केली . 


सुशांत, विकास, राकेश, सुरज, प्रसाद आणि सुदीप उर्फ हिमालय पुत्र




झापापासून उजवीकडे खाली उतरण्यास आम्ही सुरुवात केली खरी परंतु बर्याच वाटांच्या भूल-भुलैय्या मध्ये शेवटी व्हायचे तेच झाले आणि आम्ही वाट चुकलो . मात्र तेवढ्यात रानामध्ये गुरे सांभाळण्यासाठी आलेला एक वृद्ध धनगर (बाबाजी आखाडे)  देवासारखा धावून आला आणि थोड्याच वेळात कोयत्याने सपासप वार करत वाटेवरची झुडुपे साफ करत त्याने चक्क आमच्यासाठी वाट तयार केली आणि आम्हाला आंबिवली च्या मुख्य वाटेला लावून तो पितृतुल्य धनगर आल्यासारशी निघून हि गेला. मागील वर्ष अखेरीच्या ट्रेक मध्ये सुद्धा जेव्हा आम्ही कोंड नाळी मध्ये अडकलो होतो , तेव्हा कळंबनीच्या  जाधव मामा देवदूत बनून अवतरले होते , या वेळेस अगदी तसाच अनुभव आम्हाला आखाडे आजोबांच्या रूपाने आला . सह्याद्रीची माया म्हणा किंवा दैवी योगायोग , दुसरा काय .. थोड्याच वेळात आम्ही आंबिवली ला पोहोचलो.

आंबिवली गाव


इथून आमचे सवंगडी सुदीप माने उर्फ हिमालय पुत्र यांना पुण्याला जायचे असल्याने त्यांनी आमचा निरोप घेतला आणि खेड गाडीमध्ये बसून पुण्यनगरीकडे प्रस्थान केले. खरतर त्यांना सगळा ट्रेक करायचा होता परंतु २-३ दिवस पुण्याला आई वडिलांकडे राहून त्यांना लगेच चेन्नइ ला जायचे होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. १०-१५ मिनटा मध्ये खचाखच भरलेली वडगाव ST आली आणि आम्ही उरलेल्या ६ जणांनी पण स्वताला त्या गर्दीत कोंबून घेत वडगाव कडे प्रस्थान केले. 

१ तासात आम्ही वडगाव ला पोहोचलो परंतु चुकून मुख्य वडगाव ऐवजी वरच्या वाडीत उतरलो . त्यामुळे परत मागे फिरून १ किलोमीटर तंगडतोड करत वडगाव खुर्द मध्ये पोहोचलो. वाटेवर जगबुडी नदीच्या नितळ पाण्यात यथेच्च स्नान करून सर्वजन शुचिर्भूत झालो आणि आमचा मुक्काम पडला गावाच्या शाळेत. 

वडगाव मधली शाळा

वडगाव
लगोलग चूल मांडून गरमा गरम चहा घेत आम्ही रात्रीच्या भोजनाची तयारी सुरु केली . बल्लवाचार्य राजे यांनी परत एकदा आपले पाक कलेतील कौशल्य सादर करत खमंग सोयाबीन खिचडी बनविली आणि आम्ही पण ती मिटक्या मारत फस्त केली. शाळेच्या वरांड्यात आम्ही आमच्या वळकट्या उघडल्या आणि थोड्याच वेळात निद्रिस्त झालो.




सकाळी उठून चहापान करेपर्यंत आमचे वाटाडे श्री ढेबे मामा हजार झाले आणि आम्हीपण आमचे पिठू पाठीला लावून कूच केले किल्ले महीपतगडाकडे. वडगावातून महीपत गड ही  सुमारे ५-६ तासाची खडतर चढाई असून वाटेत फक्त एका ठिकाणी पाणी आहे . सुमारे दोन तास दाट जंगलातून चढाई केल्या नंतर आम्ही महीपतला काटकोनात धावणाऱ्या एका डोंगर रांगेवर पोहोचलो . इथून समोरच सुमारगड आणि परिसराचे अतिशय रम्य दर्शन होते.

खोऱ्या मधलं  वडगाव



सुमारगड

आधी इथे वाडी बेलदार गावाची वस्ती होती परंतु दुर्गमतेमुळे आणि खाली वडगावमध्ये वीज रस्ते आदी सुविधा आल्यामुळे आता इथे केवळ पडक्या घरांचे काही अवशेष पाहायला मिळतात.  वाटेत एका पाणवठ्यावर पाणी भरून घेऊन आम्ही आम्ही आमची पुढील वाटचाल सुरु केली. डोंगर चढत उतरत , जंगल टप्पे पार करत अखेरीस महीपत गडाचा पूर्वेकडील बुरुज दृष्टीक्षेपात आला आणि सर्वाना हायसे वाटले .मात्र शेवटच्या टप्प्यातील खड्या चढणीने सर्वांचाच चांगला घाम काढला आणि एक छोटा खडकटप्पा पार करून अखेरीस आम्ही पोहोचलो महीपत गडाच्या पूर्व शिखरावर.

महिपतगड चा बुरुज

या जागेवरून आजूबाजूच्या सह्यरांगाचे  केवळ अप्रतिम दर्शन होते . पूर्वेकडे खाली वडगाव गाव तर त्यामागे क्षितीज भेदत उंचावलेली अगणित गिरिशिखरे , उजवीकडे सुमारगड , रसाळगड आणि कितीतरी डोंगर . इथून ढेबे मामानी आमचा निरोप घेतला आणि आम्हाला पारेश्वर मंदिराची वाट दाखवून ते पुन्हा वडगाव कडे मार्गस्थ झाले . आता इथून पुढची वाट शोधणे खरे आव्हानात्मक होते कारण १२२ एकर क्षेत्रफळाच्या आणि घनदाट अरण्याने वेढलेल्या महिपतगडावर वाट चुकणे सहज शक्य होते . डेंगळे यांच्या nexus  वर GPS लावून सुद्धा काही फायदा झाला नाही . अखेर चाचपडत का होयीना आम्ही एका मळलेल्या पायवाटेला लागलो आणि सुशांत ला विजेचा एक खांब दिसला . त्यावरील तारेचा माग काढत दुसरा खांब , मग तिसरा असे करत आम्ही शेवटी पारेश्वर मंदिरात पोहोचलो आणि मंडळीनी सुटकेचा निश्वास टाकला.

 मंदिरात बेलदार वाडीतले काही ग्रामस्थ आधीच गप्पा मारत बसले होते . २००७ च्या डिसेंबर ट्रेक मध्ये मी सत्या आणि आमोद इथेच मुक्कामाला आलो होतो . मंदिरामध्ये आता वीज आली होती , लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता . बाहेरील पाण्याच्या विहिरीला पण पक्के सिमेंट चे कठडे बसवले होते. मात्र आजूबाजूचे जंगल आणि परिसराचा रमणीयपणा आहे तसाच होता.

परेश्वर मंदिर - महिपतगड

१२ महिने पाणी - महिपतगड


सलग ६ तासाच्या चढाई ने थकलेल्या भरारी च्या मंडळी ना (म्हणजे मी, डेंगळे आणि राक्याला) आता ३१ च्या रात्री काहीतरी चमचमीत खायची इच्चा होती . जणू आमच्या मनातलं ओळखत एका गावकरी भाउनी आम्हास आनंद वार्ता दिली - गावात गावरान कोंबडा मिळेल !!!  गावरान कोंबडा म्हटल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि मी आणि राकेश कोंबडा आणायला सरळ बेलदार वाडीत रवाना झालो-श्री गणपतराव निकम यांच्याबरोबर. निकम मामानी आम्हास पुढील दिवशी दहिवली पर्यंत सोडण्याचा पण कबुल केला . अर्धा पाऊन तास पायपीट केल्यानंतर आम्ही बेलदार वाडीच्या टुमदार वस्तीत आलो आणि निकम मामांच्या पडवीत विसावलो . आता पोटात कावळे चांगलेच कोकलायला लागले होते . काहीतरी खायला मिळाले तर बरा होयील अशी राकेश ने इच्चा व्यक्त केली आणि काय आश्चर्य... त्या घराच्या माउलीने काही न सांगता आम्हास मस्त तांदळाच्या भाकर्या , झणझणीत चटणी आणि भाजी आणून दिली. त्या अस्सल कोंकणी गावरान मेव्यावर तुटून पडत आम्ही काही वेळातच तृप्तीचे ढेकर दिले.

पंच पक्वान

 तोपर्यंत भाउनी कोंबडा कापून आम्हास एका पिशवीत बांधून दिला आणि त्यावर बोनस म्हणून कि काय मावशीनी त्यांच्या घराचा झणझणीत मसाला पण एक पुरचुंडीत बांधून दिला . निकम मामांना पण आम्ही आमच्या बरोबर वर परत येण्याचा निमंत्रण दिला आणि त्यांनीसुद्धा त्यास होकार भरला. परत वर आल्यानंतर डेंगळे यांना कोंबडा रस्सा बनविण्याची प्रेमळ गळ घालण्यात आली कारण गावरान चिकन बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे हे आम्हास अनुभवाने चांगलाच ठाऊक होता. डेंगळे यांनी पण फारसे आढेवेढे न घेता राकेश च्या मदतीने मस्त मसाला बनविला आणि चिकन शिजायला टाकले .चिकन शिजेपर्यंत तानसेन राकेश यांनी एकाहून एक ठेवणीतली गाणी आणि कविता आपल्या पहाडी आवाजात सादर केल्या. पारेश्वर चा तो रमणीय परिसर , हवेतला गारवा , चांदणी रात्र आणि राकेशचा पारेश्वराच्या गाभार्यात घुमणारा दमदार आवाज , ३१ डिसेंबर च्या रात्री यापेक्षा अजून काय हवा? कान तृप्त झाल्यानंतर आता वेध लागले पोटोबाचे, मस्त गावरान चिकन रस्सा आणि भात यावर उभा आडवा हात मारत त्यालाही शांत करण्यात आले . 

३१ डिसेंबर ची मेजवानी

 


जेवणानंतर आवराआवर करून सर्वजन शेकोटीच्या उबेमध्ये विसावले आणि गप्पांच्या ओघात गेल्या ३ दिवस केलेल्या खडतर डोंगर यात्रेचा शीण कुठल्या कुठे विरून गेला .मंदिरामध्ये असलेल्या चटयांवर आम्ही आमच्या वळकट्या उघडल्या आणि निद्राधीन झालो .
सकाळी उठल्या उठल्या सर्वांनी एकमेकांना नव वर्षाच्या शुभेच्चा दिल्या आणि महीपत गडावरची नव वर्षाची पहिली सकाळ अनुभवण्यासाठी बाहेर आलो . सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता . पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरु होता आणि दुधात साखर म्हणून कि काय त्यात राजेंनी खमंग पोह्यांचा बेत केला होता . पोहे खाऊन आणि चहा पेउन सर्वांनी सामानाची बांधाबांध केली व मंदिराची साफसफाई करून महीपत गडाचा निरोप घेतला.

महिपतगड वरून परतीचा प्रवास

२-२.५ तासांच्या उतरणी नंतर आम्ही दहिवली मध्ये आलो . पाहतो तर आम्हाला पुण्याला घेऊन जाण्यासठी आमचे ड्रायव्हर अन्ना आमच्या आधीच तिथे येउन थांबले होते. दहिवली च्या नदीमध्ये स्नान करून कपडे बदलून ताजेतवाने होत आम्ही आमच्या गाडीमध्ये स्थानापन्न झालो आणि महीपत गडाला शेवटचा मुजरा करत पुण्याकडे प्रस्थान केले . नांदवी गावी आम्ही निकम मामांना त्यांची बिदागी देऊन निरोप घेतला . वाटेत भोजनासाठी आणि चहासाठी थांबा घेत, गप्पा मारत पुण्यास पोहोचलो. निरोप घेत सर्वांनी  एकमेकांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील मोहीमेसाठी लवकरच भेटण्याचे ठरवून आपापल्या निवासस्थानी परतण्यास सुरुवात केली.
४ दिवसाची सुंदर डोंगर यात्रेची सांगता झाली होती , शरीर थकले होते , मनपटलावर मात्र अजूनही तरळत होती सह्याद्रीची ती नानाविध रूपे .. चकदेवाचा चौकेश्वराचा गाभारा , ती पातालभेदी शिडीची वाट , हिरवागार कोकण , सह्याद्री च्या कुशीत राहणारी आणि सह्याद्री सारखीच विशाल अत:करणांची ती माणसे, आकाशात घुसलेली अनंत शिखरे, घाटमाथ्यावरचा भन्नाट रानवारा , दिमाखात आपले बाहू पसरून उभा असलेला तो अचाट आणि बेलाग महिपतगड , क्षितिजापर्यंत पसरलेला शिव सागराचा अथांग जलाशय , घनदाट , सदाहरित जंगल पट्टे आणि तारकांनी भरलेल्या नभांगानाखाली घालविलेल्या त्या रात्री ...  आयुष्यभर जतन करून ठेवावा असा अविस्मरणीय जीवनानुभव !!!     





मोहिमेचे  शिलेदार:

सुरज पाटील, निकम मामा, सुशांत पाटील, आमोद राजे, प्रसाद डेंगळे, राकेश जाधव, विकास पोखरकर (डावीकडून)

 

अधिक छायाचित्रे: