Tuesday, May 26, 2015

स्वर्गावर स्वारी ! कुर्डूगडावर भरारी !!



स्वर्गावर स्वारी ! कुर्डूगडावर भरारी !! 


भरारीच्या सह्यभटक्यांना तसा ट्रेकिंग साठी कुठलाच ऋतू वर्ज्य नाही , भले मग तो मुसळधार पाउस असो , कुडकुडनारी थंडी असो वा रणरणते उन ! उत्साह असा कि ऎक आवाज दिला , मेलामेली केली कि मंडळी पाठीवर पाठ्पिश्व्या लावून लगेच तयार ... त्यामुळे खरतर मागच्याच महिन्यात ऐन उन्हात वासोटा सर करून आलेली पोरं कुर्डू गडावर यायला पण लगेच तयार झाली . मात्र दुर्देवाने ऐन वेळेस बर्याच जणांना काही काही अपरिहार्य कामे निघाली शेवटी उरलो मी , राजे आणि गाजरे . खरतर सह्याद्रीमध्ये उन्हाळ्यात  ट्रेकिंग ची एक वेगळीच मजा असते . ऐन उन्हामध्ये , सह्याद्रीच्या सदाहरित जंगल पट्ट्या मधून , उन सावलीचा खेळ खेळत आणि वाटेतल्या करवंद जांभळाची गोडी चाखत चालणे फारच सुखद वाटते . तिथे AC ची गरज लागते ना fan ची हवा. दुसरे म्हणजे उन्हाळ्या मध्ये ट्रेकिंग च्या नावाखाली कुठल्याच किल्ल्यावर जत्रा भरत नाही . आमच्या सारख्या एकांत प्रिय ट्रेकर्सला त्यामुळे पर्वणीच . निवांत पने सह्याद्री मध्ये मनमुराद भटकंती करावी . लक्ख सूर्यप्रकाशात भरपूर फोटो ग्राफी करावी , दिवसभर वैशाख वनवा अंगावर घेतल्यानंतर , रात्री किल्ल्यावरचे थंडगार पाणी पेउन , सुखद रानवारा खात पिठूर चांदण्या खाली एखाद्या खडक शय्येवर निवांत पहुडावे.  केवळ स्वर्गसुख !!




कोकणातला कुर्डूगड हा असाच एक निसर्गसुंदर किल्ला आहे . ताम्हिणी घाट संपल्यानंतर डावीकडे जिते गावाला जायला एक फाटा आहे . तिथून साधारण २० किमी अंतरावर हा किल्ला आहे . घाट माथ्यावरून सुधा कुर्दुगडावर जायला दोन मार्ग आहेत . पहिला म्हणजे ताम्हिणी गावातून डावीकडे वळून लावासा प्रकल्पाला जोडणाऱ्या रस्त्याला लागायचे आणि घाट माथ्यावरचे शेवटचे गाव - धामणओहोळ गाठायचे. दुसरा म्हणजे सरळ मुठ्यावरून लवासा गिरी शहरातून धामणओहोळ ला जायचे . हा मार्ग धोपट मार्ग असल्यामुळे सर्वात चांगला आणि डांबरी रस्ता असलेला आहे .

भिडू कमी असल्यामुळे खासगी गाडी करता राजे यांच्या मारुती स्विफ्ट मधून जायचे ठरले . गजरे आदल्या दिवशी रात्री आमच्याकडे आले आणि सकाळी उठून ठरल्याप्रमाणे आम्ही बरोबर ११ वाजता चांदणी चौकात जिजाऊ मध्ये हजर झालो. हो ना करता करता अखेरीस डेंगळे सुधा ऐन वेळेस तयार झाले आणि १२ वाजता चांदणी चौकात येउन आम्हास सामील झाले . बहुदा गजरे यांचा "चल रे डेंगळे , तुझी खेचायला ना सत्या आहे ना वाळिंबे , तुला बरा वाटेल, काही त्रास होणार नाही " हा सल्ला रामबाण ठरला आणि डेंगळे आमच्या कंपू मध्ये सामील झाले :)
अर्थात राजे यांनी डेंगळे यांना सत्या आणि वाळिंबे यांची आजिबात कमतरता जाणवून दिली नाही हा भाग वेगळा :)
११ वाजता येणारे राजे (नेहेमीप्रमाणे) फक्त तास उशिरा आले , आणि त्यांची वाट पाहता पाहता आम्ही उसाच्या रसाचे - ग्लास  ग्लास रिचवले . शेवटी एकदाचे राजे आले आणि त्याच्या गाडीत आपापले सामान टाकले आणि ऐन उन्हात आम्ही प्रवास सुरु केला . लवासा च्या सिमेंट च्या जंगलातून जाण्यापेक्षा ताम्हिणीच्या रांगड्या निसर्गातून जाणार्या रस्त्याने जायचे ठरले.  वाटेत दिशास मध्ये जेवणासाठी एक थांबा घेत शेवटी आम्ही पोहोचलो ताम्हिणी गावामध्ये. इथून पुढे बर्यापैकी डांबरी रस्ता होता , मात्र थोड्याच वेळात कच्चा रस्ता सुरु झाला आणि एक अवघड वळण पार केल्यानंतर तर कच्चा म्हणावा असादेखील रस्ता नव्हता . होते फक्त अस्ताव्यस्त पसरलेले दगड . मात्र अशा कठीण जागेतून सुधा राजेंनी अत्यंत कौशल्याने गाडी काढली अखेरीस आम्हास सिमेंट चा रस्ता दृष्टीपथात आला . मात्र तो रस्ता थोडा उंचावलेला असल्यामुळे त्यावर चढण्यासाठी आम्हाला एक दगड गोट्यांची एक छोटी उतरंड  तयार करावी लागली . आणि शेवटी - जोरदार प्रयत्नानंतर अखेरीस राजे यांनी यशस्वीपणे गाडी सिमेंट च्या रस्त्यावर चढविली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला . इथला आजूबाजूचा निसर्ग मात्र अगदीच सुंदर आणि अनाघ्रात होता . दोन्ही बाजूला सदाहरित जंगल आणि नाना प्रकारच्या पक्ष्यांची किलबिल सुरु होती . रस्ता सिमेंट चा जरी असला तरी जेमतेम एक गाडी बसेल असा होता . शेवटी एक छोटासा घाट पार करून आम्ही लावासा च्या मागील बाजूस असलेल्या वस्ती पाशी आलो. ही दासवे धरणाची मागील बाजू आहे. निसर्गाच्या राज्यातला तो मानवी हस्तक्षेप पाहून वाईट वाटले पण काय करणार . आजकाल लोक यालाच विकास म्हणतात . कालाय तस्मै नम: !
इतपर्यंत आमोद च्या mobile मधल्या GPS  ने बरोबर दिशा दर्शन केले होते . मात्र धामनओहोळ गाव इथून पुढे अजून किमी होते . रस्ता सुधा चांगला रुंद आणि बरा होता. अर्ध्या तासात आम्ही गावात पोहोचलो . गावकर्यांना रस्ता विचारल्यावर कळले कि घाटमाथ्यावर एक पत्र्याची शेड आहे ( ग्रामीण भाषेत छत्री) . आणि तिथूनच उजवीकडे उतरणारी वाट कुर्दुगडाकडे जाते. मात्र छत्री जवळ पाणी मात्र नव्हते.


एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि आभाळ सुधा भरून आला होता . पाउस येणार हे जवळपास निश्चित होता. शेवटी बरोबर पाण्याचा भरपूर साठा घेऊन आणि शिधा घेऊन आम्ही  छत्रीकडे प्रस्थान केले . तिथपर्यंत अगदी गाडी रस्ता होता , परंतु धोपट मार्गाने जातील ते ट्रेकर्स कुठले . थोडा चालल्या नंतर आम्ही सरळ मध्ये शेतात घुसलो आणि नंतर कारवीच्या दाट रानात शिरलो.
शेवटी दाट झाडीतून वाट काढत, वाटेतली टपोरी करवंदे खात खात एकदाचे मुख्य पाय वाटेला लागलो आणि छत्री दृष्टीक्षेपात आली.

तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. छत्री पर्यंत पोहोचेपर्यंत चांगलाच पाउस पडायला लागला होता मात्र पत्र्याची शेड असल्यामुळे आम्ही वाचलो. थोड्याच वेळात पाउस थांबला आणि खाली पसरलेल्या कोकणाचे विहंगम दर्शन घेण्यासाठी आम्ही छत्रीच्या टोकाला आलो. ही छत्री अगदी घाटमाथ्यावर बांधलेली असल्याने निसर्गाने लयलूट केलेल्या आणि सरळ खाली कोकणात झेपावणाऱ्या असंख्य डोंगररांगाचे अवर्णनीय दृश्य इथून दिसते . डावीकडे खाली कुर्दुगडाचा सुळका लक्ष्य वेधी असून त्यावरील बुरुज आणि गुहा सुधा स्पष्ट दिसतात . उजवीकडे हिरवाईने नटलेले ताम्ह्नीचे डोंगर आहेत तर मागे धामनओहोळ गाव. मात्र ऐन वेळेस आलेल्या पावसामुळे आम्हास खाली उतरून कुर्दुगडावर मुक्कामी जायचा बेत रद्द करावा लागला.  
भरपूर फोटो सेशन केल्यानंतर शेवटी सगळ्यांना पोटोबाची आठवण झाली . "आता काही पाउस येणार नाही. चल चूल पेटवू" असे राजेंनी म्हणायचा अवकाश कि परत एकदा वरून राजाने रौद्र रूप धारण केले . इतका मुसळधार पाउस सुरु झाला कि कुर्दुगडासहित अवघा कोकण धुक्याच्या  पडद्याआड अदृश्य झाला . सुमारे एक तास अखंड झोडपून काढल्यानंतर बहुदा पावसाला आमची दया आली आणि त्याने उसंत घेतली. आकाश निरभ्र झाले आणि आजूबाजूला डोंगरावर उतरलेल्या ढगांची  आणि आणखी निसर्ग दृश्यांची छायाचित्रे घेण्यात मंडळी रममाण झाली . आता पोटात भुकेने थोडी कावकाव करायला सुरुवात केली होतीच . छत्रीच्या सांगाड्या खालील जागा झाकली असल्याने थोडी कोरडी होती आणि तिथले गवत आणि काही बारीक काड्या पण कोरड्या होत्या. तिथेच चूल मांडायचा निर्णय मी आणि राजे यांनी घेतला आणि शेवटी थोड्याफार प्रयत्नाने तेल शिंपडत का होयीना पण आम्ही चूल पेटविली. जास्त जळण नसल्याने आणि आहे ते हि ओले असल्याने शेवटी आम्ही फक्त म्यागी करायचा ठरवला.  


 थोड्याच वेळात म्यागी फस्त करून आम्ही पथार्या पसरल्या. अत्यंत थंड वारे असल्यामुळे ऐन मे मध्ये आम्हास कुडकुडनार्या थंडीचा अनुभव येत होता. तानसेन राकेश नसल्यामुळे आम्ही राजे आणि डेंगळे यांच्या मोबाईल मधील श्रवणीय गझला आणि जुन्या गाण्यांचा आनंद घेत झोपी गेलो.


सकाळी झुंजूमुंजू होताच आम्हास जाग आली आणि घाट माथ्यावरच्या रम्य पहाटेचा आनंद घेत आम्ही सूर्योदयाची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळात सूर्य नारायणाने दर्शन दिले आणि अवघा आसमंत त्याच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाला . चहापान करून आणि कुर्डू गडाचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो . आलेल्या वाटेने जात गाडी रस्त्याने जायचे ठरले . वाटेत चालताना डेंगळे यांचा पाय एका दिवड जातीच्या बिनविषारी सापावर पडणार तेवढ्यात मला तो सर्प दिसला आणि मी डेंगळे यांना जरा बाजूला लोटले . साप थंड रक्ताचे जीव असल्याने पहाटेच्या कोवळ्या उन्हात पहुडणे त्यांना आवडते. त्यामुळे रानवाटेवरून चालताना थोडी खबरदारी घ्यावी लागते . भरपूर फोटो सेशन केल्यानंतर तो साप आजूबाजूच्या झुदुपांमध्ये सळसळत दिसेनासा झाला.  


वाटेतल्या सोमाजीबाबा मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही गावात पोहोचलो आणि सामान राजेंच्या गाडीत टाकून परतीच्या प्रवासास सुरुवात केली .रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही लावासा मार्गे जायचे ठरविले. जाताना वाटेत "हॉटेल प्रसाद" येथील झणझणीत मिसळ पावचा फडशा पडून आम्ही तासाभरातच पुण्यनगरीत पोहोचलो .  पुण्यात पोहोचल्यावर आम्ही गजरे यांना वाकडला बस मध्ये बसवून निरोप घेतला आणि श्रम परिहार करण्यासाठी थेट माझ्या सोसायटीच्या जलतरण तलावामध्ये दाखल झालो. सत्या पन आम्हास सामील झाला. तासभर डुंबून आणि पिझ्झा रिचवून शेवटी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि येणाऱ्या पावसाळ्यात कुर्डूगड करायचाच असा निश्चय करून आपापल्या निवासस्थानी रवाना झालो.
मोहिमेतील सहभागी मावळे - आमोद राजे , अमित गजरे, प्रसाद डेंगळे , विकास पोखरकर.


-काथेश