Monday, September 21, 2015

रांगडा किल्ले धोडप


किल्ले धोडप


लेखक: श्रीयुत विकासराव   पोखरकर साहेब



         किल्ले धोडप नाशिक जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या सात माळ रांगेवर वसलेला , निसर्गाने आणि इतिहासाने सुदधा मुक्त हस्ताने उधळण केलेला एक नितान्त सुंदर दुर्ग. मागील पावसाळ्यातच  साल्हेर ट्रेक वरून येताना हा मनमोहक किल्ला भरारी च्या मावळ्यांच्या मनात भरला होता आणि पुढच्या पावसाळ्यात तो करायचाच अशी पक्की खुणगाठ आम्ही बांधली होती . पूर्व पश्चिम पसरलेली आणि इंग्रजी U आकाराने विभागलेली अवाढव्य कातळ भिंत व उजवीकडे आकाशात घुसलेला एखाद्या तपस्वी ऋषींच्या जटेसारखा सुळका अशा वैशिष्ट्यपूर्ण आकाराने हा किल्ला दूरवरूनच आपला लक्ष वेधतो . 


शिवाय किल्ल्यावर बरेचसे जुने अवशेष , जुन्या वास्तूंच्या खाणाखुणा , बांधीव विहिरी , पाण्याची टाकी , मंदिरे , गुहा , भुयारे , तळी अशी कितीतरी प्रेक्षणीय स्थळे आहेत .  पूर्वेला इखारा सुळका , कांचना दुर्ग आणि बाकीचे डोंगर तर पश्चिमेला सप्तशृंगी गड , रावळ्या -जावळ्या जोडकिल्ले अशा सुरेख दुर्गरत्नाच्या गराड्यात हा किल्ला मोठ्या दिमाखात आपले सौंदर्य लेवून उभा आहे . शिवाय परिसरामध्ये बर्यापैकी जंगल व झुडुपी रान असल्यामुळे डौलदार मोरासाहित नानाविध पक्ष्यांच्या अनेक जाती इथे सुखेनैव विहार करीत आहेत .  त्यामुळे दुर्ग प्रेमींसाठी आणि हौशी छायाचित्रकारांसाठी हा किल्ला नेहेमीच एक आकर्षण राहिला आहे . 

  

       तसा पहिला तर या वर्षीचा पावसाळी ट्रेक राजे यांच्या कौटुंबिक कारणास्तव आधीच लांबला होता .त्यात पावसाने पण ओढ दिलेली .  त्यामुळे भरारी चे मावळे ट्रेक साठी चांगलेच अधीर झाले होते . ठरल्याप्रमाणे मेलामेली करून तारीख ठरली ५-६ सप्टेम्बर २०१५ . पुण्यावरून मी, कर्णधार राजे , प्रसाद डेंगळे उर्फ वारे बत्तीवाले आणि अक्षय बोरसे  तर मुंबई भरारी चे खंदे कार्यकर्ते अमित गाजरे असे भिडू ठरले . खरतर गजरे आम्हाला नाशिक ला येवून मिळणार होते पण बोरसे आपली तगडी SUV Nissan Terrano काढणार म्हटल्यावर त्यांनी विचार बदलला आणि आम्हास सरळ पुण्याला सामील व्हायचे त्यांनी ठरवले  :) . नवीन बत्ती खरेदी करून मी सरळ शिवाजीनगर येथे पोहोचलो . गजरे व डेंगळे सुधा थोड्याच वेळात सामील झाले आणि दुधात साखर म्हनून कि काय चक्क सत्या सुधा आम्हास निरोप देण्यासाठी जातीने हजर झाला .  थोड्याच वेळात राजे आणि बोरसे यांचे आगमन झाले आणि गणपती  बाप्पा मोरया करत आम्ही नाशिक च्या दिशेने कूच केले . 

        मजल दर मजल करत, डुलक्या घेत चहा पाण्या साठी थांबा घेत पहाटेच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या "हट्टी" गावात पोहोचलो . मुख्य गावातल्या मंदिरामध्ये आधीच मुंबई वरून आलेली काही ट्रेकर मंडळी थांबलेली असल्यामुळे आम्ही परत मागे येवून एका छोटेखाणी हनुमान मन्दिराच्या ओसरीवर विश्रांती घ्यायचे ठरवले . 
 
हेच ते मण्यार चा मंदिर
     राजे आणि डेंगळे यांनी आपपल्या वळकट्या पसरल्या आणि उरलेल्यानी  गाडीमध्ये झोपायचे ठरवले. तेवढ्यात मंदिरातून परत येताना गजरे यांच्या पायाला कसला तरी स्पर्श झाला आणि बघतात तर काय बाजूच्या गवतामधून प्रणय रंगात रंगलेली अति विषारी मण्यार जातीच्या सापांची जोडी त्यांच्या पायाशीच दाखल झाली होती . ते पाहून  त्यांची बोबडीच वळली कारण त्यांचा पाय थोडा जरी इकडे तिकडे झाला असता तर काही खर नव्हते. विजेच्या वेगाने गजरे गाडीकडे धावत आले आणि त्यांची किंकाळी ऐकून आम्ही सुधा जागे झालो . ते अनपेक्षित सर्प द्वय पाहून आम्हीही तसे घाबरलो पण थोड्याच वेळात आमची भीती थोडी चेपली कारण प्रेमालापात रमलेल्या त्या युगुलाला कसलेच भान नव्हते .आम्हीसुद्धा भयमिश्रित विस्मयाने त्या अतिजहाल विषारी सापांचे नृत्य नि:शब्द होऊन पाहत होतो . कुणीही कॅमेरा काढायच्या मनस्थिती मध्ये नव्हते . एखाद्या शास्त्रीय नर्तक नर्तकीच्या पदलालीत्याला लाजवेल इतक्या कमनीय पणे ते सर्प द्वय एकमेकांच्या शरीराला बिलगत होते . 
 अगदी भान हरपून अनिमिष नेत्रांनी आम्ही ते अनोखे निसर्ग नृत्य आमच्या मन:पटलावर साठवत होतो . त्यांच्या केवळ ५-६ थेम्बामध्ये संपूर्ण मज्जासंस्था निकामी करू शकणाऱ्या जहाल विषाचा आणि त्यापासून असणाऱ्या संभाव्य धोक्याचा आम्हाला संपूर्ण विसर पडला होता. अखेर थोड्याच वेळात ते सर्प युगुल सळसळत आजूबाजूच्या गवतामध्ये नाहीसे झाले आणि आम्ही सुद्धा त्या समाधी अवस्थेतून जागे झालो . ट्रेक च्या सुरुवातीलाच निसर्ग देवतेने इतका सुंदर शुभ संकेत दिला होता !!

        
      आता झोप तर अगदीच उडाली होती . शेवटी गाडी वळवून घेऊन पुन्हा आम्ही मुख्य गावात आलो . गावातल्याच विहिरीवर मुख प्रक्षालन करून बाजूच्या हॉटेल वर गरमागरम चहा आणि खमंग कांदे पोहे चापून व सामानाची वाटावाट करून किल्ल्याकडे मार्ग क्रमण सुरु केले . चांगली रुळलेली पायवाट असल्याने आम्ही वाटाड्या घेण्याचा बेत रद्द केला . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे हे मुळ  गाव . त्यांच्याच सहकार्याने इथे एक निसर्ग पर्यटन केंद्र साकारत आहे . त्या केंद्रामध्येच एक डेरेदार पिंपळाच्या झाडाखाली बांधलेला एक सुबक पार आहे . तिथे पोहोचताच रात्र भर प्रवासाने शिणलेल्या आम्ही भरारीच्या मावळ्यानी  आपापल्या पाठ पिशव्यांना थोडा आराम दिला आणि मस्तपैकी त्या थंडगार सावलीत ताणून दिली . थोड्याच वेळात सर्वजन  स्पर्धा केल्यासारखे घोरू लागले .
   

सुमारे तासाभराच्या विश्रांती नंतर ताजेतवाने होत आम्ही आजूबाजूच्या निसर्गाचे अवलोकन सुरु केले . संपूर्ण परिसर सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला होता . समोर अवाढव्य धोडप किल्ला पूर्व पश्चिम पसरला होता आणि त्याच रांगेत पूर्वेकडे एखारा सुळका आकाशात घुसला होता . आजूबाजूच्या जंगलामधून वेग वेगळ्या पक्षांची किलबिल सुरु होती आणि मोराचा सुश्राव्य केकारव सुद्धा कानाना सुखावत होता . हळुहळू मंडळींचे कॅमेरे बाहेर आले आणि एकच क्लिकक्लीकाट सुरु झाला . कुणी धोडप आणि इखारा टिपत होता तर कोणी मोरांचा पिसारा चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न करत होता . बोरसेने तर बाजूच्या निसर्ग निरीक्षणा साठी असलेल्या उंच मचानावारच कॅमेरा घेऊन ठाण मांडले होते .  शेवटी फोटोग्राफिची हौस भागल्यावर सर्वांनी आपापले पिठू कसले आणि वाटचाल सुरु केली किल्ले धोडप कडे ! 


सुमारे तासाभराच्या चढाई नंतर आम्ही पहिला टप्पा पार केला आणि गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो . इथेच एक हनुमानाची पुरातन देवडी असून किल्ल्याच्या मागे असलेल्या "ओतूर" गावातून दोन फरसबंदी वाटा येउन मिळतात .
 


                                                                                                                                                                    थोडे अंतर गेल्यावर एक गवळ्यांची छोटी वस्ती असून येथील   शुद्ध दुधाचा खवा प्रसिद्ध आहे .
सोनारवाडी


वाटेत काही खोदीव पाण्याची टाकी व एक अर्धवट बुजलेले भुयार सुद्धा आहे . या भुयाराचे दुसरे टोक बहुदा किल्ल्याच्या कातळ कड्यावर उघडत असावे कारण खालून गावातून ते स्पष्ट दिसते . वस्तीवरून सरळ गेल्यावर २ जुनी मंदिरे आणि पाण्याची टाकी आहेत तर उजवीकडची खड्या चढणीची फरस बंदी वाट सरळ किल्ल्यावर जाते.  या दोन वाटांच्या संगमावारच सुमारे ५० फुट खोल असे एक प्रेक्षणीय पुरातन  बांधीव टाके आहे . तिथे उतरायला दगडी पायर्यांची वाट असून पाणी अत्यंत नीतळ आहे.



दोन्ही मंदिरे बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा या टाक्या पाशी आलो आणि इथून आमची खडी चढण सुरु झाली . 


शेवटच्या टप्प्या मधला पायऱ्या
सुर्यनारायण माथ्यावर पूर्ण तेजाने तळपत असल्यामुळे ती चढी फरसबंदी वाट चढताना आमची चांगलीच दमछाक होत होती त्यात पाठीवर अवजड सामान , त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर विश्रांतीसाठी थांबा घॆत हळूहळू का होयीना आम्ही शेवटी एकदाचे लोखंडी शिडीपाशी आलो .

 फोटोसेशन साठी थांबा घेत अखेरीस किल्ल्य्याच्या दुसर्या दरवाजाशी आलो . परत एकदा पाठ पिशव्यांना आराम दिला आणि घामाघूम झालेल्या शरीराला थोडी विश्रांती देण्यात आली . इथेच अजून ऎक पायवाट येउन मिळालेली असल्याने बरोबर वाटेची खातरजमा करण्यासाठी मी थोडे पुढे जाउन ती वाट पाहून आलो . परंतु तीसुद्धा खालून गडावर येणारी एक पायवाट असल्याची खात्री झाल्यामुळे आम्ही सरळ मुख्य दरवाज्यातून जाणार्या वाटेनीच जायचा निर्णय घेतला . 
धोडप चा सुळका
 
 शेवटची एक खडी चढण चढून आम्ही किल्ल्याच्या संपूर्ण कातळात  खोदलेल्या शेवटच्या दरवाज्यापाशी आलो . दरवाजा पार करून बघतो तर काय आमची परीक्षा घेण्यासाठी अजून एक छोटी चढण आमच्या आणि त्या खड्या कातळ सुळक्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहामन्दिरामध्ये उभी होती . अखेरीस उसासे टाकत धापा टाकत कसेबसे तीपण पार करून आम्ही आमच्या मुक्कामी, म्हणजे गुहेमध्ये पोहोचलो.

सर्वांग घामाने भिजले होते . खांदे पण दुखत होते  . त्यामुळे गेल्यागेल्या सर्वांनी गुहेत आपापले अवजड पिठू टाकले आणि गुहेबाहेराच्या ओसरीमध्ये सरळ ताणून दिली . चढाई च्या थकव्यामुळे सर्वजण भक्ष्य गिळलेल्या अजगरासारखे सुस्तावले होते. आमच्या आधी तिथे मुबई वरून आलेला ट्रेकर्स चा ग्रुप सुद्धा दाखल झाला होता . 
तासा भराच्या विश्रांती नंतर चहाचे आधन टाकून नवीन बत्तीचे उद्घाटन करण्यात आले. मस्त आलेयुक्त चहा पिऊन ताजेतवाने होत कॅमेरे गळ्यात अडकवत आम्ही दुर्ग निरीक्षणा साठी निघालो.  




गुहामन्दिराच्या बाजूलाच एक बारमाही पाण्याचे टाके आहे  . त्याला लागून शंकर पार्वतीचे पुरातन मंदिर असून बाजूला जवळपास ३०-४० लोक झोपतील एवढी गुहा आहे. 

 
मंदिराची पूजा अर्चा स्वच्छता करण्यासाठी सध्या तिथे एका साधुबाबांचे वास्तव्य आहे . या  साधुबाबांशी चर्चा करताना कळाले की त्यांनी सुमारे २ वर्षापूर्वी दीक्षा घेतली आहे व संसार त्याग करून तप करण्यासाठी ते इथे दाखल झाले आहेत. त्यातच त्यांनी नाथ संप्रदायाशी निगडीत अशा काही पौराणिक कथा सांगितल्यामुळे साहजिकच हे महंत फारच ज्ञानी असावे माझा समज झाला.  
एव्हाना सुर्य नारायण मावळती कडे झुकले होते . आणि आम्ही गुहेच्या बाजूने असलेल्या अरुंद पायवाटेवरून सरळ पश्चिमेकडील कातळ भिंतीकडे निघालो होतो .  दोन्हीकडे खोल दर्या असलेला हा चिंचोळा मार्ग आपल्याला थेट गडाच्या पश्चिम टोकाशी घेऊन जातो. वाटेच्या दोन्ही बाजूला रंगीबेरंगी रान फुलांची  जत्रा भरली होती .  बाजूचा  धोडपचा सुळका अवाढव्य जहाजासारखा भासत होता . पूर्वेकडे इखारा सुळका , कांचना दुर्ग आणि कितीतरी शिखरे मावळतीच्या उन्हात चमकत होती तर पश्चिमेकडे रावळ्य़ा  जावळ्य़ा जोडकिल्ले आणि  वणीचा सप्तशृंगी गड धुक्यामध्ये हरविला होता . दक्षिणेकडे खाली हत्ती गाव आणि आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेस येत होता . उत्तरेकडे दूरवर बागलाण मुलुखाचे विहंगम दर्शन होत होते . आणि जणू काही त्याचे पहारेकरी असलेले  साल्हेर आणि सालोटा दुर्गद्वय सुद्धा पुसटशे दिसत होते. 

 संपूर्ण कातळ भिंतीला जिथे ती इंग्रजी "U" आकाराने विभागली आहे तिथपर्यंत लोखंडी रेलिंग असल्यामुळे तसे फारसे दृष्टीभय जाणवत  नव्हते .






 





  चालत आम्ही सरळ पश्चिम टोकापाशी आलो आणि कॅमेरांचा एकच क्लिकक्लीकाट   सुरु झाला . कारण पश्चिम क्षितिजावर निसर्ग अक्षरश: रंग पंचमी खेळत होता .  जाता जाता त्या सहस्त्ररश्मी ने आपल्या पोतडीतल्या सर्व रंगाची अमाप उधळण केली होती . भरारनाऱ्या वाऱ्या वर मराठेशाहीचा प्रतिक असलेला भगवा ध्वज दिमाखात फडकत होता आणि त्या रमणीय पार्श्वभूमीवर फोटोसेशन करण्यात आम्ही भरारीचे सवंगडी अगदी दंग झालो होतो .सच्च्या निसर्गप्रेमी ट्रेकर ने  धोडप वरचा तो सूर्यास्त खरोखर एकदातरी  अनुभवलाच पाहिजे . 

त्या नितांत सुंदर जागेवरून खर तर पाउल निघत नव्हते पण आता पोटामध्ये कावळे चांगलेच ओरडायला लागले होते. त्यामुळे लगोलग गुहेत येउन रात्रीच्या भोजनाचे सामान बाहेर काढण्यात आले . बत्ती पेटली . दिवे , विजेऱ्या बाहेर निघाल्या .

  मुगाची खिचडी आणि सोयाबीन ची भाजी वजा चटणी असा खमंग बेत ठरला आणि आम्ही कांदे बटाटे , टोमाटो , मिरच्यांची कापाकापी सुरु केली. बल्लवाचार्य वाळिंबे यांच्या अनुपस्थितीत मुख्य आचारी  झाले आमचे कर्णधार राजे. थोड्याच वेळात तडतडीत फोडणी देऊन राजेंनी खिचडी शिजायला टाकली आणि त्या खमंग वासाने आमची भूक अजूनच चाळवली.
थोड्याच वेळात सोयाबिनची भाजी पण झाली आणी दिवसभर उपाशी असलेले मावळे त्या सुग्रास भोजनावर मिटक्या मारत तुटून पडले .  तृप्तीचे ढेकर देऊन आणि आवराआवर  करून सर्वजन गुहेबाहेर ओसरीवर आडवे झाले आणि गप्पाष्टकात रंगून गेले . रात्रीच्या अंधारामध्ये आजूबाजूचा परिसर मिणमिणत्या दिव्यांनी भरून गेल्यासारखा दिसत होता . थंडगार वारे दिवसभर शिणलेल्या शरीर आणि मनाला सुखावत होते. डोळ्यासमोरून ढगांचे थवेच्या थवे वेगाने धावत दिसेनासे होत होते. दिवस सार्थकी लागला होता आणि मेहेनतीचे चीज झाले होते . धोडप सारखे अनोखे दुर्गरत्न गवसले होते . त्या स्वर्गीय वातावरणाच्या धुंदीत आम्ही कधी निद्रिस्त झालो कळलेच नाही . 
      




सकाळी उठून पाहतो तर काय तर सगळीकडे केवळ शुभ्र ढगांचे साम्राज्य पसरले होते. आजूबाजूची शिखरे म्हणजे जणूकाही श्वेतसमुद्रावर तरंगत असलेले हिरवे  हिमनग भासत होते . परत एकदा सगळ्यांचे कॅमेरे बाहेर निघाले आणि मनसोक्त छायाचित्रण करून आम्ही चहाच्या तयारीला लागलो .


 प्रातर्विधी आटपून आणि चहा नाश्ता करून आम्ही गडाच्या पूर्व टोकावर असलेल्या सुळक्यावर जाण्यासाठी निघालो . गडाला एक छोटा वेढा घालत व घसाऱ्याच्या  वाटेवर चढत घसरत आम्ही कसेबसे सुळक्यावर पोहोचलो . पुन्हा एकदा एक छोटे फोटोसेशनचे  सत्र  पार पडले आणि आजूबाजूचे निसर्ग दृश्य डोळ्यात साठवत , परतीच्या वाटेत घसरगुंडी खेळत परत गुहेमध्ये आलो . पाहतो तर काय गुहेच्या आजूबाजूला माकडांची जत्रा भरली होती . मग उरलेसुरले  खाणे त्यांना चारत परत एक फोटो सेशन झाले .






अखेरीस सामानाची बांधाबांध करून आम्ही बाकीच्या ट्रेकर मंडळींचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गाला  लागलो . सुमारे दोन तासांनी आम्ही पायथ्याशी आलो आणि सरळ एका नितळ पाण्याच्या शेत तळ्यामध्ये शुचिर्भूत होण्यासाठी दाखल झालो. एकमेकांच्या अंगावर पाण्याची पातेली रिकामी करत सगळ्यांनी अगदी खळखळून स्नान केले . थंडगार पाण्याच्या स्पर्शाने सर्व थकवा आणि मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. ताजेतवाने होत आम्ही सामान गाडीमध्ये टाकले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ कडे रवाना झालो . वाटेत भोजनासाठी एक थांबा घेत व श्रीयुत गजरे यांना नाशिक च्या गाडीत बसवून देत आम्ही लासलगाव - शिर्डी मार्गे पुण्य नगरीकडे मार्गस्थ झालो .  

 



रात्री पुण्यात आल्यावर वाघोली येथील सुप्रसिद्ध हॉटेल कावेरी मध्ये मस्त भाकरी मटन चापून आम्ही शहरामध्ये आल्यावर एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या निवास स्थानी रवाना झालो .
बऱ्याच कालावधी नंतर आखलेली मोहीम फत्ते झाली होती आणि सर्व नियोजन - श्रम सार्थकी लागले होते . भरारीच्या दुर्गभेट यादीमध्ये धोडप सारखा रांगडा किल्ला सामील झाला होता . आठवणींच्या खजीन्यामध्ये अजून काही मौल्यवान रत्नांची भर पडली होती . मण्यार सर्प समागम नृत्य , पिसारा फुलवून नाचणारे मोर , खोदीव विहिरी , पुरातन मंदिरे सर्वोच्च स्थानी असणारे अद्भुत गुहामन्दीर आणि तिथून दिसणारे अवर्णनीय निसर्ग दृश्य या दुर्गयात्रेतील  अशी कितीतरी क्षणचित्रे स्मृतीपटलावर साठवत कधी निद्रिस्त झालो , मलाही कळले नाही . 

मोहिमे चे मावळे: आमोद राजे, विकास पोखरकर,अक्षय बोरसे, प्रसाद डेंगळे व अमित गाजरे