लेखक : श्रीयुत काथेश
कोंड नळीच्या चित्त थरारक मोहिमे नंतर मी निदान पुढचा वर्ष भर तरी ट्रेक
करणार नाही असा ठरविला होता . घळीतला तो जीवघेणा अनुभव विसरणे शक्य नव्हते . ती रात्र ,ते भयावह जंगल , गळालेले हातपाय , ती न संपणारी घळ , खडकावरचा मुक्काम आणि एकंदरीतच झालेले हाल पाहता आता ट्रेक ला थोडा स्वल्प
विराम द्यावा असाच मला वाटत होता . परंतु त्या सह्याद्रीची जादूच अशी आहे की एकदा
त्याच्या कुशीत शिरायची सवय लागली की कितीही शारीरिक व मानसिक थकवा आला तरी त्याची साद नेहेमीच जाणवत राहते . त्या
अनगड पायवाटा खुणावत राहतात , भरारणारा वारा शीळ घालत भोवती पिंगा घालत जणू सह्य
भ्रमंतीचा पुन्हा आमंत्रण देतो . सरळसोट , उत्ताल कडे स्वागतासाठी आलिंगन दिल्यासारखे भासतात आणि मन सज्ज होता पुन्हा एकदा त्या रांगड्या सह्य सख्याच्या अंगा खांद्यावर "भरारी" घेण्यासाठी !!
 |
कोकण दिवा माथा |
राजेंनी यावेळेस मोहीम मुक्रर केली ती कोंकण आणि देशाच्या सीमेवर असलेल्या , रायगडाचा जणू जागता पहारेकरी असलेल्या छोटेखानी परंतु
नावाप्रमाणेच सुंदर अशा कोंकणदिव्याची !! सर्व मेलामेली करून अखेरीस
दिवस ठरले २३ , २४ फ़ेब्रुवारी . भरारी मुंबई शाखेचे खंदे कार्यकर्ते श्री अमित गजरे मुंबईच्या ७ मावळ्यांना घेऊन आणि आम्हाला बाणेर येथून उचलून , राजे आणि मंडळीना सिंहगड रोड येथे भेटणार असे ठरले . मा.
अध्यक्ष उर्फ बल्लवाचार्य श्री निलेश भाऊ वाळिंबे आणि कोंकण दिवा मोहिमेचा पूर्वानुभव
गाठीशी असलेले श्री अक्षय बोरसे नंतर येउन आम्हाला थेट किल्ल्यावरतीच भेटणार असेही राजे यांनी सांगितले (बिच्चारे !!, कुणावरही विश्वास ठेवतात)
तर ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी अभिरुची समोर एकत्र आली आणि
मारुती स्विफ्ट , मारूती एस्टीम आणि एक CBZ
extreme दुचाकी अशा ताफ्या वरून , सर्व जय्यत तयारीनिशी सर्व मावळ्यांनी कूच केले थेट पानशेत मार्गे
किल्ल्याच्या पायथ्याच्या घोळ गावाकडे . खडकवासला धरण ओलांडल्यानंतर काही वेळातच
शहरी गर्दी आणि प्रदूषण मागे पडले आणि पश्चिम घाटाची मोकळी हवा चित्त वृत्ती प्रफुल्लीत
करू लागली . वाटेतच एका धाब्यावर क्षुधा शांती साठी एक थांबा घेण्यात आला आणि
पोटोबा शांत केल्या नंतर पुन्हा पानशेत कडे प्रवास सुरु झाला . काही वेळातच आम्ही
पानशेत धरणाच्या फुगवट्या ला समांतर जाणार्या रस्त्याला लागलो आणि पश्चिम घाटाच्या निसर्ग वैभवाचा आनंद घेऊ लागलो . एका बाजूला पानशेत चा निळाशार जलाशय तर दुसरीकडे वनराई ने नटलेल्या डोंगर रांगा पाहत आमचा प्रवास सुरु झाला . मात्र , ठीक ठिकाणी तारेच्या आणि सिमेंट च्या कुम्पनानी अडविलेल्या आजु बाजूच्या वन जमिनी पाहून काहीतरी चूक चुकल्यासारखे वाटत होते व हे निसर्ग वैभव फार काल टिकणारे नाही याचीही सखेद जाणीव होत होती .
 |
घोल गावातून गार्जाई वाडी कडे जाणारा रस्ता |
काही ठिकाणी अजस्त्र यंत्रे त्या सह्याद्रीची वाटेतल्या वृक्ष वल्ली सकट चिरफाड करायला सरसावली होती अन निसर्गाचा लचका तोडून माणूस धावत होता विकासाच्या खोट्या मृगजळामागे. सह्याद्रीशी आणि
शिवप्रभूशी बेइमानी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ आणि बाजी घोरपडे यांच्या आधुनिक औलादी पांढरया चकचकित गाड्या मधून आपल्या गळया - मनगटा तले सोने मिरवत दिमाखात मिरवत होत्या. निसर्गाचा बळी न देताही प्रगती साधता येते , पर्यावरण पूरक योजना राबवून सुधा रोजगार निर्माण करता येतो हे शेजारच्या गुजरात
राज्यांने दाखवून दिले आहे . परंतु आपल्या कपाळ करंट्या राजकारण्याना कोण समजावणार ? इस्त्राइल सारखा देश वाळवंटा मध्ये नंदनवन फुलवितो आणि समृद्धी व रोजगार निर्माण करतो . इथे मात्र आम्ही निसर्गाने भरभरून दिलेल्या पश्चिम घाटाची नासधूस करत स्वत:च्या तुंबड्या भरतो .असो .
तर साधारण पणे २ तासात आम्ही घोळ गावी पोहोचलो . इथून किल्ल्याच्या
पायथ्याचे गाव गारजाइ वाडी ४ कि मी दूर होते मात्र तिथपर्यंत जाणारा गाडी रस्ता
फारच कच्चा आणि दगड गोट्यांनी भरलेला होता .त्यामुळे घोळ गावातच आमच्या गाड्या लावून आणि वाटाड्या घेऊन आम्ही पुढे निघालो . तास - दीड तासात
आम्ही गारजाइ वाडी मध्ये पोहोचलो .थोडा विसावा घेतल्या नंतर पुढे दाट जंगला मधून छोटे मोठे डोंगर चढत उतरत आमची
पायपीट सुरु झाली .मध्येच वाटेत अखंड खडकात कोरलेली कालीमातेची एक छोटी पण सुबक देवडी लागते, तिचे दर्शन घेऊन आम्ही कोंकण दिवा आणि कावळ्या घाटाच्या मध्ये असलेल्या सड्यावर पोहोचलो .तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि सुर्यनारायण क्षितीजापलीकडे अंतरधान पावले होते .
मात्र जाताना त्यांनी मावळतीला रंगांची अशी काही उधळण केली होती की त्या
पार्श्वभूमीवर आमचे कॅमेरे बाहेर निघाले नसते तरच नवल . मग काय कॅमेर्यांच्या
क्लीक क्लीकाटात सगळ्यांची छायाचित्रे काढून घेण्याची आणि काढण्याची स्पर्धाच सुरु
झाली .
 |
अप्रतिम सूर्यास्त |
थोडा वेळ झाल्यानंतर "बाबाहो चला आता , रातच्या आत गडावर जायचा हाय " म्हणत आमचे वाटाडे श्री किसन भाऊ यांनी हाळी दिली . तरीपण अंधाराने आम्हाला गाठलेच . सर्वांनी आपापल्या विजेर्या बाहेर काढल्या आणि वर आभाळात चांदोबा पण आम्हाला प्रकाश देण्यासाठी अवतरले .
 |
घसर गुंडी मार्ग |
इथून शेवटचा टप्पा म्हणजे खडी चढण आणि त्यात भुसभुशीत मातीचा
घसारा अशी कसरत होती . नाही म्हणायला कारवीची झुडपे वाटेच्या दोन्ही बाजूला उभी
होती .चढत - घसरत कसेबसे आम्ही कोंकण दिव्याच्या माथ्याच्या थोडे खाली असलेल्या
गुहेत पोहोचलो . १०-१५ जन राहू शकतील ती गुहा तशी बर्यापैकी स्वच्च होती . बाजूलाच
खडकात खोदलेला थंड गार पाण्याचा हौद होता . त्यातला पाण्याला केवळ अमृताचीच उपमा देता येयील
इतका ते चवदार होता .
 |
पाण्याचे टाके |
 |
मुक्काम पोस्ट..गुहा |
थोडी विश्रांती झाल्यानंतर तयारी सुरु झाली ती भोजनाची .
काड्या सरपण गोळा करून मी चूल पेटविली आणि कांदे -
बटाट्याची कापाकापी करून राजे यांनी फोडणी दिली . मात्र कितीही पाणी घालून भात
काही शिजेनाच !! गजरे , मी, राजे यांनी पुष्कळ प्रयत्न केले परंतु कुणाचीच डाळ शिजली
नाही . शेवटी मंडळीनी तो अर्धा कच्चा भात खाऊनच आपली भूक शमविली . बल्लवाचार्य
वाळिंबे यांची उणीव आम्हाला प्रकर्षाने जाणविली . मोहिमेच्या थकव्यामुळे काही
मंडळी लगोलग निद्राधीन झाली तर आम्ही काहीजण गुहेबाहेर चांदण्यांनी खचाखच भरलेल्या
नभांगनाखाली शिळोप्याच्या गप्पा मारत बसलो .
सकाळी पाखरांच्या किलबिलाटाने जाग आली आणि बाहेर येउन पाहतो तर सर्व परिसर कोवळ्या सुर्य किरणांनी न्हाहून निघाला होता .
प्रातर्विधी
आटपून काही मंडळी गुहेबाहेर येउन बसली होती . मला नेहेमीप्रमाणे चहा बनविण्याचा
काम सोपवण्यात आला . चहापानानंतर सगळेजण गुहेच्या माथ्यावरील छोटासा कातळ टप्पा
पार करून कोकण दिव्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो आणि आजूबाजूचा देखावा पाहून
भान हरपून स्तिमित झालो .
केवळ अवर्णनिय असेच त्याचे वर्णन करता येयील . कोकण दिवा हा किल्ला चक्रव्यू मध्ये असलेल्या अभिमन्यू सारखा भासत होता, चहू बाजूनी डोंगर रांगांनी वेढलेला आहे.दक्षिणेकडे राजबिंडा रायगड एकदम डौलात उभा होता .
त्यावरील जगदिश्वराचा मंदिर आणि राजमहालाचा काही भाग स्पष्ट दिसत होता आणि टकमक
टोकाची रौद्र भीषण दरीपण . त्याच्याच बाजूला लिंगाण्याचा उत्तुंग सुळका
आजूबाजूच्या डोंगरामध्ये उठून दिसत होता . पूर्वेकडे दुरवर तोरणा त्याच्या बुधला
माचीसकट पुसटसा दिसत होता तर उत्तरेकडे तैलबैल आणि बाजूचा घनगड . पश्चिमेकडे कोंकणात उतरणारा घनदाट जंगलाने व्यापलेला कावळ्या घाट , संदोशी आणि पाचाडचा परिसर फारच विलोभनीय दिसत होता .
 |
कोकण दिवा आणि आजू बाजूचा परिसर |
भरपूर
फोटो सेशन केल्यानंतर पोटातले कावळे ओरडायला लागले आणि गुहेत परत येउन व गरमा गरम
म्यागीचा फडशा पडून मंडळी पुन्हा एकदा थोडी विसावली .थोड्याच वेळात सर्व गुहा स्वच्च करून सामानाची बांधाबांध झाली आणि आम्ही पुन्हा एकदा घसरगुंडी खेळंण्यासाठी सज्ज झालो .घसार्यावरून घसरत आणि
आपल्या पार्श्व भागाचा पुरेपूर वापर करत मावळे खालच्या सड्यावर येउन विसावले .
आतड्यांची जोरदार हालचाल झाल्यामुळे कि काय ज्यांची सकाळी शिकार झाली नव्हती किंवा
अर्धवट झाली होती त्या सगळ्यांना पुन्हा एकदा "जायची " इच्चा झाली.
त्यांची पोटे साफ होई पर्यंत बाकीची मंडळी जरा विसावली .
 |
brake लावून झल्या नंतर मंडळींनी break घेतला |
परत एकदा दाट झाडी मधल्या कालीमातेचा दर्शन घेऊन
मावळ्यांनी गारजाइ वाडीकडे कूच केले . तासाभरात आम्ही वाडीत पोहोचलो आणि कच्च्या
सडकेने आजू बाजूची करवन्दे खात , गप्पा मारत १ तासात घोळ गावी पोहोचलो .थोडा विश्राम घेतल्यानंतर आणि किसन भाऊ ना त्यांची
बिदागी दिल्या नंतर आम्ही आपापल्या रथामध्ये स्थानापन्न झालो आणि पानशेत कडे
मार्ग क्रमन सुरु केले .पानशेत धरणाच्या खाली असलेल्या एका उपाहार गृहासमोर आम्ही
थांबलो आणि जेवनाची ऑर्डर देऊन सर्व जन श्रम परीहारासाठी आंबी नदीच्या वाहत्या
ओहोलामध्ये उतरले .त्या थंड गार पाण्यामध्ये डुंबून मंडळी एकदम ताजीतवानी झाली .
भोजन झाल्या नंतर पुण्या मुंबई च्या भरारी वीरांनी एकमेकांचा निरोप
घेतला आणि पुढचा ट्रेक साठी लवकरात लवकर भेटण्याचा ठरवून मंडळी आपापल्या घरांकडे मार्गस्थ
झाली .
 |
भरारी पथक |
मोहिमेतील सहभागी मावळे :- विकास पोखरकर (काथ्या), आमोद राजे , सतीश
सूर्यवंशी , सुरज पाटील
, अमित गजरे , भूषण, हरेश, प्रतिक, अनुराग, अभिषेक आणि नागराजू
||कथेश||
भरारी...