लेखक: श्रीयुत विकासराव पोखरकर
जुन्नर
तालुक्यातील दुर्गवाडी वरून खुट्ट्य़ा च्या वाटेने कोकणात रामपूर …. भरारीचा आतापर्यंतचा सर्वात
चित्त थरारक , अवघड ,जीवघेणा आणि दीर्घ ट्रेक ….
३-४
तासात दुर्गवाडी वरून कोकणात उतरू असा बेत
असताना तब्बल १४ तास भरारीच्या ९ मावळ्यांची आणि ३ पारधी पोरांची चाललेली अथक शर्थ
, तुटलेले
कडे , खाली
आ वासून पसरलेली आणि जणू काही वरच्याला गिळन्कृत
करण्यासाठी नेहेमी सज्ज असलेली भयाण दरी , घसार्याची वाट,
जेमतेम एक पावूल मावेल एवढीशी कड्याच्या धारेवरची वाट ,
एकाहून
एक अवघड असे सरळसोट खडक टप्पे , संपलेले पाणी,
पावला
पावलाला निसट्नारे लहान मोठे दगड , रात्रीचा गडद अंधार आणि साथीला उजेड
म्हणून फक्त मिणमिणत्या विजेर्या … थोडक्यात काय तर खाली उतरता उतरता
कधीपण "वर" जायची अप्रतिम सोय . कोंड नाळ आणि गुयरीचा दार एकत्र केला
तरी सुद्धा ही खुट्ट्य़ाची वाट कठीणपणाच्या कसोटीवर कितीतरी वरचढ भरेल .
गदिमांच्या
भाषेत - "मरण कल्पनेशी थांबे तर्क
जाणत्यांचा ! पराधीन आहे जगती पुत्र
मानवाचा !!" या उक्तीचा सार्थ प्रत्यय देणारी ही वाट आम्हास विज्ञान
कितीही पुढे गेले तरी माणसाची आयुष्याची दोरी ही फक्त निसर्ग ,
नियती
आणि परमेश्वर यांच्याच हातात असते याचा साक्षात्कारी अनुभव देवून गेली .
ट्रेक मार्ग |
प्रत्येक वर्षाखेरीस एक तगडा ट्रेक आखायचा आणि
नव वर्षाचे स्वागत सह्याद्रीतील गिरीशिखरांच्या साथीने उजाडणाऱ्या दिनकराच्या
सोनेरी किरणानी करायचे ही भरारीची गेल्या ८ वर्षांची परंपरा . यावेळेस सुद्धा
राजेंनी - जुन्नर तालुक्यातील आंबोली येथून धाकोबा वर चढाई ,
धाकोबा
वरून दुर्गला प्रयाण , नंतर दुर्ग किल्ल्यावरच्या बगलेतून जाणार्या खुट्ट्य़ाच्या वाटेतून
खाली कोकणात रामपूर येथे उतरून परत डोणी
दाराने दुर्गवाडी पर्यंत चढाई असा भरगच्च कार्यक्रम आखला होता . तब्बल ९
मावळे संपूर्ण मोहिमेत सामील होणार होते तर मा. अध्यक्ष उर्फ बल्लवाचार्य वाळिंबे ,
CTO सत्या आणि
अंण्डरस्कोर राहुल आम्हास ३१
तारखेला दुर्गवाडी येथे येवून मिळणार होते . कृपया या नावांची उत्पत्ती कशी झाली
हे विचारू नये . मोठा इतिहास आहे.परंतु खरच जिज्ञासा (खाज) असेल ,
तर
वाळिंबे यांना लिहा अथवा भेटा (शक्यतो भेटाच !)
भरारी चे सहभागी मित्रमंडळ |
तर
ठरल्याप्रमाणे ३० डिसेंबर ला रात्री
प्रत्येक मावळ्याला त्याच्या जवळच्या ठिकाणावरून उचलत आम्हीं पुणे नाशिक
महामार्गावरून जुन्नर च्या दिशेने प्रयाण केले . वाटेत नारायणगाव येथे मस्त मसाला दुध आणि चहाचा आस्वाद घेत आणि तोफांचा फडशा
पाडत (क्रीम रोल ला वाळिंबे यांनी दिलेला मराठी प्रतिशब्द) रात्री 3 च्या सुमारास आम्ही आंबोली येथे
पोहोचलो. जुन्नर तालुक्यातील हा भाग बिबट्यान्च्या लोक वस्तीवर असलेल्या
वावरासाठी प्रसिद्ध आहे . त्यामुळे
उघड्यावर झोपताना थोडी सावधगिरी बाळगावी लागते.
पण आता सगळ्यांना एवढी झोप चढली होती की कुडकुडनार्या थंडीत गावाच्या एसटी
थांब्यावरच सर्वांनी आपापल्या पथार्या
पसरल्या आणि थोड्याच वेळात बिबट्या ची
डरकाळी पण फिकी पडेल अशा तार स्वरात सगळे घोरू लागले .
सकाळी
जाग आली . गाव आधीच जागा झाला होता. शेतकरी बंधु शेतावर निघाले
होते . शाळकरी मुलांची शाळेत जाण्यासाठी
लगबग सुरु होती . तिन्ही बाजूनी
हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला छोटासाच पण टुमदार आंबोली गाव सकाळच्या कोवळ्या सुर्य रंगामध्ये न्हाहून निघाला होता.
पश्चिमेकडे दार्या घाटा ची खिंड उठावलेली दिसत होती. दार्या घाट हा कोकणात उतरणारा
आणि नानेघाटाला समांतर असणारा एक प्राचीन घाटरस्ता आहे .
आम्ही
सुद्धा भरभर आमचे सामान आवरले आणि धाकोबाच्या दिशेने कूच केले . वाटेत
एका ओढ्याजवळ प्रातर्विधी आणि मुखप्रक्षालन करून आम्ही एका गावकरी मामाना वाटाड्या
म्हणून घेतले . धाकोबाची वाट हि एका नैसर्गिक धबधबयाच्या वाटेने वर चढते . त्या
वाटेच्या सुरुवातीलाच २ नितळ पाण्याची
कुंडे आहेत . तिथेच आम्ही आमचा पहिला
विश्राम घेतला आणि गरमागरम चहा आणि नास्ता करण्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले .
थोड्याच वेळात चूल पेटली आणि मस्त आलेयुक्त चहाचे घुटके घेत आम्ही आजूबाजूच्या
निसर्गाचा आस्वाद घेऊ लागलो . तिथे ना वाहनांचे आवाज ना शहरी गर्दी व प्रदुषण. तिथे
राज्य होते ते फक्त रमणीय आणि अनाघ्रात निसर्गाचे!
थोडा
वेळ आराम करून ताजेतवाने होत आम्ही परत आमच्या पाठ् पिशव्या कसल्या आणि पुन्हा
एकदा चढणीच्या वाटेने मार्गक्रमण सुरु केले . एव्हाना सुर्यनारायण चांगलेच तापले होते आणि खडी चढण सगळ्यांचा
चांगलाच घाम काढत होती .
सुमारे दोन तासाच्या चढाई नंतर शेवटी आम्ही धाकोबाच्या
पठारावर आलो आणि सुटकेचा निश्वास टाकला . थोड्याच वेळात धाकोबाचे मंदिर दृष्टीपथात
आले . हे छोटेखानी मंदिर अत्यंत रम्य जागी
वसले आहे . पाठीमागे दाट वृक्ष राजी आणि धाकोबाचा सुळका , समोर् विस्तीर्ण पठार आणि बाजूलाच अत्यंत चवदार पाण्याची बारमाही विहीर . रात्रीच्या मुक्कामासाठी खरतर
ही आदर्श जागा होती . मात्र सत्या , वाळिंबे आणि पराडकर ही मंडळी रात्री सरळ दुर्गवाडीला येणार असल्यामुळे आम्हाला तो बेत रद्द करावा लागला . विहिरीच्या थंड गार
पाण्याने तहान भागवत आणि थोडी विश्रांती घेत आम्ही जंगलातून जाणार्या एका
पायवाटेने दुर्गवाडीकडे प्रस्थान केले . आमच्या बरोबर आलेल्या मामांना आम्ही
त्यांची बिदागी दिली आणि त्यांनी आमचा निरोप घेतला. इथून पुढचा मार्ग आता आम्हालाच शोधायचा होता .
मात्र चांगली रुळलेली पायवाट असल्यामुळे तसे जास्त कष्ट पडले नाहीत .
वाटाड्या
नसल्यामुळे आता बहुदा धाकोबाचा सुप्रसिद्ध कोकणकडा पाहायला मिळणार नाही अशी खंत मनात
होतीच .पण काय आश्चर्य ! , अगदी पुढच्याच वळणावर आम्हाला दुर्गवाडीवरुन आंबोलीला जाणारे एक वयस्क
जोडपे भेटले. दुर्गवाडीवरुन काही सामान घेऊन ते पारधी पती पत्नी आंबोलीला चालले होते.
कोकणकड्याची वाट दाखविण्याची राजेनी त्याना विनंती केली आणि पारधी बाबा पण आढेवेढे
न घेता आमच्याबरोबर निघाले. धाकोबाचा हा कोकणकडा हरीश्चन्द्र गडाच्या कोकणकड्या पेक्षा
मोठा व विस्तृत मानला जातो . साधारण अर्ध्या तासाच्या चालीनंतर
आम्ही कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचलो .
तिथून आजूबाजूच्या सह्यकड्याचे आणि खालील कोकण प्रदेशाचे अत्यंत विलोभनीय दृश्य
दिसत होते. उजवीकडे धाकोबाचा सुळका आणि तिथून
इंग्रजी "U" आकाराची अंतर्वक्र आणि अवाढव्य कातळ भिंत सरळ खाली कोकणात झेपावत होती
. समोरच जीवधन आणि नानाच्या अंगठ्याचे विहंगम दृश्य दिसत होते. खाली पसरलेला कोकण परिसराचा पसारा नजरेत
मावत नवता . काही वेळ नुसत्या अनिमिष नेत्रांनी आम्ही ते अनोखे निसर्ग दृश्य टिपत होतो. "उघडले स्वर्गाचे दार" अशीच काहीशी अनुभूती होती . भानावर येताच सर्वांनी आपापले
कॅमेरे , मोबाईल बाहेर काढले आणि तो अवर्णनीय
अनुभव चित्रबद्ध करण्यामध्ये दंग झाले . काही वेळ घाट माथ्यावरचा भन्नाट रानवारा खात
आणि मनसोक्त छायाचित्रण करून आम्ही परतीचा मार्ग धरला आणि थोड्याच वेळात पारधी बाबांना
एक विजेरी आणि थोडी बिदागी देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला . एव्हाना सुर्य मावळतीकडे
झुकला होता .
![]() |
ढाकोबा ते दुर्ग |
त्यामुळे आम्हीसुद्धा जास्त वेळ न दवडता दुर्ग किल्ल्याकडे प्रस्थान केले.
काही सुरेख जंगल टप्पे आणि दोन तीन ओढे पार करून आम्ही दुर्ग किल्ल्याजवळ सड्यावर
पोहोचलो. इथून सरळ वाट दुर्गवाडी कडे जाते तर उजवीकडे गर्द वनराइमधे लपलेले देवीचे मंदिर आहे
. खरतर आम्हाला मुक्काम गावापासून दूर देवीच्या मंदिरामध्ये करायचा होता. परंतु मंदिरामध्ये
आधीच जवळच्या गावातील एक ग्रुप एकतीस च्या पार्टी साठी आल्याचे आम्हाला एका गुराखी
मुलाकडून समजले . त्याची खातरजमा करण्यासाठी राजे व श्रीराम मंदिराकडे गेले. आणि आम्ही
तिथेच पठारावर वर्ष अखेरीच्या शेवटच्या संध्याकाळी मावळतीची सुर्य किरणे अंगावर घेत बसलो . थोड्याच वेळात राजे आणि श्रीराम मिळालेल्या माहितीची खातरजमा करून परत आले
आणि आम्ही दुर्गवाडी मधील वापरात नसलेल्या जुन्या शाळेमध्ये मुक्काम करण्याचा निर्णय
घेतला .
दिवसभराच्या चालीने थकलेल्या मंडळीना आता चांगलीच भूक लागली होती . त्यामुळे लगोलग चूल मांडून आम्ही
स्वयंपाकाची तयारी सुरु केली . कांदा , बटाटा मिरच्या इत्यादी वस्तूंची कापाकापी
झाल्यावर राजेंनी मस्त तडतडीत फोडणी दिली आणि खमंग खिचडी चुलीवर रटरटु लागली . तोंडी
लावायला झणझणीत शेवभाजी पाहिजे असा आम्ही आग्रह
धरला आणि राजेंनी पण आमची इच्छा लगेच पूर्ण केली . पापड , लोणची , चटण्या
, मस्त सोयाबीन खिचडी आणि बरोबर शेवभाजी
(खरतर फरसाणभाजी) … अशा
सुग्रास मेजवानीवर मस्त आडवा हात मारत थोड्याच
वेळात आम्ही तृप्तीचे ढेकर दिले. जेवणानंतर काही वेळ राकेशच्या खर्जातल्या आवाजातील
एकाहून एक सरस गाण्यांचा आनंद घेत मंडळीनी आपापल्या पथार्या पसरल्या आणि एक एक करत सर्वजन निद्रिस्त झाले .
सकाळी उठून बाहेर आलो तर
सर्व परिसर धुक्याने वेढला होता . कुडकुडनार्या
थंडीतच चूल पेटली आणि आम्ही चहाची तयारी सुरु केली . थोड्याच वेळात आले आणि वेलची घालून
केलेल्या गरमगरम चहाचे घुटके घेत आम्ही शाळेच्या
वरांड्यात गप्पा मारत बसलो . नास्ता म्हणून रात्रीच्या खिचडीवर परत हात साफ करण्यात
आला आणि आंघोळ व इतर आन्हिके आटपन्यासाठी आम्ही गावाबाहेर माळावर असलेल्या विहिरीवर
प्रस्थान केले . सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये
विहिरीच्या थंडगार पाण्याने स्नान करून सर्व शुचिर्भूत झालो आणि सामानाची बांधाबांध
करण्यासाठी परत एकदा शाळेत आलो .
पण बघतो तर काय गावातील एका मुलाच्या दुचाकीवरून चक्क
अध्यक्ष वाळिंबे यांची स्वारी हजर झाली . काल रात्री येणारे हे महाशय, सत्या
आणि पराडकर बरोबर ३१ ची रात्र साजरी करता करता चुकून जुन्नर ऐवजी संगमनेर ला पोहोचले
आणि तिथून परत फिरून पहाटे गावात पोहोचले होते . त्यात त्यांच्या गाडीचा gear box खराब झाल्यामुळे त्यांना गाडी दुरुस्त करणे
भाग होते. थोड्याच वेळात सत्या आणि पराडकर सुद्धा गाडी पहिल्या गिअर वर चालवत कसे बसे
शाळेत पोहोचले. त्यात वाळिंबे यांनी खमंग पोहे करण्याचा बेत आखला . साक्षात बल्लवाचार्यांच्या
हाताचे पोहे खायला मिळणार म्हटल्यावर मंडळी जाम खुश झाली आणि वाळिंबे यांनी पण आपल्या
लौकिकाला जागत मस्त कांदापोहे बनविले. त्याचा आस्वाद घेऊन सामान आवरता आवरता आम्हाला
दुपारचे २ वाजले . वाळिंबे , सत्या आणि पराडकर यांना गाडी दुरुस्त करून
परत पुण्याला जायचे असल्यामुळे आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि खुट्ट्याच्या वाटेकडे
कूच केले .एक नाही दोन नाही तर चक्क तीन तीन वाटाडे आमच्या बरोबर येण्यास तयार झाले
. राजू, विलास आणि निम्बाजी ही त्यांची नावे .
थोड्याच वेळात आम्ही खुट्ट्याच्या वाटेच्या मुखाशी आलो . पाहतो तर काय
वाटेऐवजी एक सरळसोट कडाच आमच्या आणि खाली दिसत असलेल्या कोकण प्रदेशाच्या मध्ये उभा
होता . आमचे गंतव्यस्थळ खाली कोकणातले रामपूर गाव सुद्धा अस्पष्टसे दिसत होते. ही वाट वाटते तेवढी सोपी नसावी ही थोडीफार कल्पना
आम्हास आली . पहिल्याच खडक टप्प्यावर आम्ही बसकण मारत हळू हळू खाली उतरू लागलो . आमच्यातले
२ जन पहिल्यांदाच गिर्यारोहन करत असल्यामुळे त्यांच्यासाठी असे अवघड खडक टप्पे म्हणजे
परीक्षाच होती .हळू हळू का होयीना सर्वांनी तो धोकादायक टप्पा पार केला .
इथून पुढची वाट सुद्धा काही फार सोपी नव्हती . एका बाजूला सरळसोट कडा आणि
दुसर्या बाजूला खोल दरी व पाय ठेवायला जेमतेम पाऊलभर वाट . त्यात पाठीवर सामानाचे ओझे
असल्यामुळे तोल सांभाळणे चांगलेच अवघड जात होते .
हा टप्पा पार करून पुढे गेलो आणि पाहिला
तर एक घसार्याची वाट आमची "वाट" लावायला सज्ज होतीच . मग काय आजूबाजूच्या
कारव्याना पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत पडत घसरत पार्श्व भाग सोलून घेत आमची वरात
हळू हळू का होयीना खाली उतरू लागली .
एव्हाना सुर्य मावळतीकडे झुकला होता आणि आम्ही
सूर्यास्ताच्या आत खाली उतरून जाणार नाही हेही आम्हास कळून चुकले होते .त्यात अजून
५-६ अवघड खडक टप्पे आणि मुख्य खुट्ट्याचा सुळका , ज्याला स्थानिक ग्रामीण भाषेमध्ये
"पिळोखा" म्हणतात , ते पार
करायचे असल्याचे वाटाड्यांनी सांगितल्यामुळे धोक्याचा ताण अजून वाढला होता.
इथून पुढची वाट म्हणजे सुद्धा एक खडतर परीक्षाच होती. कारण आता आम्ही कड्याच्या कातळ
भिंतीला समांतर जाणाऱ्या अरुंद धारेवरून चाललो होतो . खाली दिसत असलेल्या भयावह दरीकडे
पाठ करून , कड्याच्या भिंतीवर ओणवे होत जेमतेम पाऊल
भर खाचेत पाय रोवत आम्ही अत्यंत सावधपणे मार्गक्रमण करत होतो .
प्रत्येक अवघड टप्प्यावर
आमचे वाटाडे आमच्या अवजड पिशव्या आधी खाली नेउन ठेवत होते , जेणेकरून
उतरण्यामधील धोका कमी व्हावा. अखेर एक टप्पा
असा आला की शेवटी आम्हास दोर बाहेर काढावा
लागला . दोराच्या सहाय्याने सर्व पिशव्या आधी खाली नेत आम्ही वाटाड्यांच्या सहाय्याने
एक एक करत खाली उतरलो.
आमच्यातील सगळ्यात नवखा असलेल्या सारंग चा हा पहिलाच ट्रेक
होता. पहिल्याच प्रयत्नामध्ये इतकी कठीण घाटवाट
उतरणे त्याच्यासाठी खरोखर आव्हानात्मक होते.
सुर्य कधीच मावळला होता . सगळ्यांनी आपापल्या
विजेर्या बाहेर काढल्या होत्या आणि त्या मिणमिणत्या प्रकाशामध्ये आम्ही ती अत्यंत अवघड
श्रेणीतील घाटवाट उतरत होतो. खडक टप्पे आणि घसार्याच्या वाटा
संपता संपत नव्हत्या.
बहुतेकांच्या विजारी
पार्श्व भागी फाटल्या होत्या . हाताची कोपरे , गुढगे सोलून निघाले होते. मात्र वाट काही
संपत नव्हती . खाली जंगलामध्ये २-3 विजेर्या चमकत होत्या. बहुतेक काही गावकरी आम्हास
इशारा करत होते. परंतु अंधारामध्ये काहीच कळावयास मार्ग नव्हता.त्यात आमचा आवाजही तिथपर्यंत
पोहोचत नव्हता .आमच्याकडचे पाणी जवळपास संपत आले होते आणि घसा मात्र चांगलाच कोरडा
पडला होता . अशा भयव्याकुळ अवस्थेमध्ये काहीजणांचा संयम सुटू लागला होता आणि त्रागा
चिडचिड सुरु झाली होती .
अखेरीस पहाटे १ वाजता आम्ही शेवटचा खुट्ट्याचा
सुळका उतरला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. इथून पुढची वाट आता घसार्याची असून
सरळ माचीवर उतरणारी असल्याचे समजल्यावर आम्हास हायसे वाटले. मात्र तरीसुद्धा आम्हास
खाली रामपूर गावात न जाता मधेच जंगलामध्ये
मुक्काम करावा लागणार होता. कारण रात्रीच्या अंधारामध्ये रामपूरची वाट सापडणे अशक्य
होते. सुमारे १ तास घसार्याच्या वाटेवरून खाली उतरल्यानंतर एका आवळ्याच्या झाडाखाली
सपाट जागा बघून भर जंगलामध्ये आम्ही आमच्या पथार्या पसरल्या.
बाजूच्याच जंगलामधून आमच्या
पारधी वाताद्यांनी कुठूनतरी पाण्याच्या बाटल्या सुद्धा भरून आणून दिल्या . शेकोटी पेटवून
तिच्या उबेमध्ये आम्ही दाटीवाटीने कसेबसे विसावलो. पारधी बंधूना सकाळच्या आत परत घाट
चढून वर जायचे असल्यामुळे त्यांना त्यांची बिदागी देऊन त्यांचा निरोप घेतला . तसेच
त्यांना सोबत काही कोरडा खाऊ आणि एक विजेरी पण देऊ केली . थोड्याच वेळात ते जंगलामध्ये
रात्रीच्या अंधारात दिसेनासे झाले . एव्हाना पहाटेचे ३.३० वाजले होते. आम्हाला दुर्गवाडी
वरून निघून तब्बल १४ तास लोटले होते. ताण आणि
थकवा याच्यामुळे अक्षरश: गळून गेल्यासारखे झाले होते.
३-४ तास आराम करून झुंजूमुंजू होताच आम्ही
परत उठलो आणि आवरावर करून पुन्हा एकदा जंगल वाटेने पुढे कूच केले .
तासाभरामध्ये आम्ही
रामपूर गावात पोहोचलो. कोकणातून आजूबाजूचा सह्याद्री अजून भव्य दिसत होता . उत्तरेकडून अलंग मदन कुलंग
कळसुबाई अशा टोलेजंग गिरी शिखरांपासून सुरु होणारी ही दुर्गशृंखला पश्चिमेकडील गोरख मच्छिंद्र आणि सिद्धगडापर्यन्त
पसरली होती .
तिथे गावाच्या सरपंचांकडे चहापान करून आम्ही
एका खासगी जीपने तळे या मुरबाड - म्हसे मार्गावर
असलेल्या गावी आलो. वाटेत एका तलावावर यथेच्छ
डुंबून ताजेतवाने होत आम्ही सरळ एक अस्सल कोंकणी खानावळ गाठली. तिथल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळीवर उभा आडवा
हात मारून आम्ही सरळ एका शेतामध्ये जाउन लवंडलो आणि डुलकी घेऊ लागलो . थोड्याच वेळात
आमचे चक्रधर अण्णा यांचे आगमन झाले आणि आम्ही पुण्यनगरीकडे प्रस्थान केले.
वाटेत चहापाण्यासाठी थांबा घेत आम्ही रात्री
८ च्या सुमारास पुण्यात पोहोचलो आणि सगळ्यांना त्यांच्या निवास स्थानी सोडून निरोप
घेतला .
२०१५ चा वर्ष अखेरीचा हा ट्रेक अनपेक्षितपणे
भरारीचा
आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय ट्रेक ठरला. इतक्या धोकादायक वाटेने
येउन सुद्धा सर्वजन सुखरूप पोहोचल्याबद्दल
आम्ही परमेश्वराचे अनंत आभार मानले . विशेष कौतुक करावे लागेल ते सारंग आणि योगेश यांचे
!! पहिलीच वेळ असून सुद्धा इतकी अवघड घाटवाट दोघांनी कसलीही तक्रार न करता कमालीच्या
धैर्याने आणि संयमाने पार केली. २०१२ ची कोंड नाळ, २०१४ ची गुयरीच्या दाराची वाट आणि या वेळेसची
खुट्ट्याची वाट .. इथून पुढेही भरारीच्या
मावळ्यांना अशाच अनोख्या आणि अनवट घाटवाटा सर करायला मिळोत .. अशी प्रार्थना करत आणि
खुट्ट्याच्या वाटेची काही क्षण चित्रे डोळ्यासमोर आणत कधी निद्राधीन झालो मलाही कळले
नाही .
भरारी चे सहभागी कार्यकर्ते:
आमोद राजे, विकास पोखरकर (काथ्या), प्रसाद डेंगळे (डेंगू ३ ), राकेश जाधव (राक्या), राम अय्यर (श्री राम), योगेश भडके , अश्विन मेंद्कुडले , राहुल सरडा , सारंग
पाहुणे कलाकार :
निलेश वाळिंबे (अध्यक्ष ), सतीश सूर्यवंशी (CTO-सत्या), राहुलराव पराडकर साहेब (_ underscore)
क्षणचित्र संच:
आमोद राजे : https://picasaweb.google.com/117760375022487958029/YET15_KutaDaar?authuser=0&feat=directlink
विकास पोखरकर: https://plus.google.com/photos/113451229024388740008/albums/6246728483602840945?cfem=1
प्रसाद डेंगळे: https://plus.google.com/photos/110711080160996254162/albums/6240336489798959089?authkey=CJyNzfH-jc2jjgE&cfem=1
Ekdum mast.... Memorable !!!!!!
ReplyDeleteReally Awesome blog and minute details were taken care off... Hats off!!! Missed such a awesome trek :|
ReplyDeleteGoing Great guys. Keep it up. I would also like to join you some day for a trek!
ReplyDeleteJabardast blog.....loved it
ReplyDeleteकाथ्या, नेहमीप्रमाणे खूप सुरेख प्रवासवर्णन केले आहेस. भरारी च्या मावळ्य़ांना साजेशी मोहीम, त्यांच्यातील जोश, एकी आणि सह्याद्री वरील प्रेम या सर्व छ्टा तूझ्य़ा लेखनात नेहमीच दिसून येतात.काही अपरीहार्य कारणामूळे या मोहिमेत सहभागी होता आले नाही याची खंत आधीपासूनच होती त्यात तूझे रसाळ वर्णन वाचून अजूनच भर पडली. असो पण तूझ्य़ा लेखन कलेनी तरी किमान माझा हा प्रवास वर्च्यूअली पूर्ण केला.
ReplyDeleteअसेच लेखन करीत जा आणि भराची ची दूर्गभ्रमंती अशीच चालू राहूद्यात हीच नूतन वर्षाची प्रार्थना.
मराठी भाषा पोखरुन लिखाण कस असाव ते 'पोखरकरांकडुन' शिकावं , आणि उचलली दुर्ग मोहीम पुर्ण्त्वास कशी न्यावी हे 'भरारी' च्या मावळ्यांकडून शिकावं!
ReplyDeleteसगळ्या भरारी मावळ्यांना सलाम !
खुप छान.... दुर्गसफर घडवून दिलीत आम्हालासुद्धा.
२०१६ च्या वार्षिक मोहिमेसाठी शुभेच्छा !
खूपच थरारक अनुभव होता..... 👌👌🙏
ReplyDelete